कमी झालेलं वजन काही दिवसांतच पुन्हा पटकन वाढतं? डॉक्टर सांगतात ६ टिप्स, वजन राहील स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2025 14:44 IST2025-08-22T11:25:48+5:302025-08-22T14:44:05+5:30

बऱ्याच जणांना ही समस्या जाणवते की कमी झालेलं वजन काही दिवसांतच पुन्हा एकदम पटकन वाढतं. जेवढ्या जलद गतीने वजन कमी केलं तेवढंच ते पटकन वाढतं.
यामुळे मग कित्येक जण वैतागतात आणि वजन कमी करण्याचा प्रयत्नच पुर्णपणे सोडून देतात. असं तुमच्या बाबतीत होत असेल तर वजन कमी करण्याचे हे काही नियम काही दिवस पाळून पाहा. हे नियम तज्ज्ञांनी marathi.nutritionist या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.
सगळ्यात पहिला नियम म्हणजे व्यायामाचा अतिरेक करू नका. वजन कमी करायचं म्हणून काही दिवस अनेक लोक खूप जास्त व्यायाम करतात. यामुळे वजन तर कमी होतंच, पण तुमचं शरीर खूप जास्त व्यायाम खूप दिवस करू शकत नाही. मग व्यायाम करणं अचानक थांबवलं जातं आणि वजन पुन्हा वाढतं. त्यामुळे रोज ठराविक व्यायाम करा. पण त्यात सातत्य ठेवा.
जे व्यायामाचं तेच डाएटचं. डाएट करताना दिवस दिवस उपाशी राहू नका. यामुळे मग डाएटिंग असह्य होतं आणि पुन्हा आपण भरपेट जेेवायला सुरुवात करतो आणि वजन वाढवून घेतो. त्यामुळे डाएटचा पण अतिरेक नको.
तिसरा नियम म्हणजे आहारात प्रोटीन्सचं प्रमाण वाढवा. प्रोटीनयुक्त पदार्थ जास्तीतजास्त खा. यामुळे एनर्जी टिकून राहण्यास मदत होते.
चौथा नियम असा की फळं, पालेभाज्या, भाज्या भरपूर प्रमाणात खा. त्यातून फायबर आणि मिनरल्स चांगल्या प्रमाणात मिळतात.
पाचवा नियम म्हणजे कार्बोहायड्रेट्स खाणं पुर्णपणे बंद करू नका. ते खा पण खाण्याचं प्रमाण मर्यादित ठेवा. तसेच फॅट्सचं प्रमाण मर्यादित ठेवा.
चांगले फॅट्स देणारा सुकामेवा, चिया सीड्स, जवस असे पदार्थ नियमितपणे खा.