चुकूनही सोशल मीडियात लहान मुलांचे 'असे' फोटो शेअर करु नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 02:41 PM2019-01-07T14:41:57+5:302019-01-07T14:48:43+5:30

सोशल मीडियात फोटो शेअर करण्याची क्रेझ आता वेगळ्याच स्तरावर गेली आहे. लोक मित्रांसोबतचे, फॅमिलीसोबतचे फोटो लगेच क्लिक करुन सोशल मीडियात शेअर करतात. त्यांना असं वाटतं की, यात काही गैर नाहीये. पण जेव्हा विषय लहान मुलांचा असतो तेव्हा विषय सामान्य राहत नाही. कारण इंटरनेटचे जेवढे फायदे आहेत, तितकंच त्यापासून नुकसानही आहे. तुमच्या लहान मुलांचे फोटो सोशल मीडियात शेअर करताना तुम्ही विचारही केला नसेल की, हे किती घातक ठरु शकतं. काही फोटो असेही असतात जे चुकूनही शेअर करायचे नसतात.

अंगावर कपडे नसलेले फोटो - तुम्ही अनेक पालकांना पाहिले असेल की, ते उत्सहाच्या भरात लहान मुलांचे आंघोळ करतानाचे फोटो सोशल मीडियात शेअर करतात आणि नातेवाईकांसोबतही शेअर करतात. असं करुन पालक केवळ त्यांच्या मुलांच्या प्रायव्हसीत लुडबूड करत आहेत. तसेच या फोटोंचा चुकीच्या पद्धतीने वापरही केला जाऊ शकतो.

आजारी आणि जखमी असल्याचा फोटो - तुमच्या आजारी किंवा जखमी झालेल्या मुला-मुलींचे फोटोही सोशल मीडियात शेअर करु नये. पॅरेंटींग एक्सपर्ट, डॉ. क्रिस्टी गुडविन सांगतात की, जास्तीत जास्त लोकांच्या पॅरेंटींग स्टाइलला काही अवॉर्ड मिळत नसतो. तुमच्या कामासाठी जेवढी प्रशंसा मिळते तेवढी पॅरेंटींगसाठी मिळत नाही. अशात आजारी मुला-मुलींचे फोटो शेअर करुन पालकांना लगेच लाइक्स आणि कमेंट मिळतात. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कमेंट केल्या जातात. असं करणं अ‍ॅडिक्टिव होऊ शकतं.

लाजिरवाणे फोटो - हे लक्षात ठेवायला हवे की, लहान मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास, आत्म सन्मान आणि स्वाभिमान बालपणापासूनच विकसीत होत असतो. अनेकांना असं वाटत असतं की, त्यांची लहान मुलं विचार करण्यासाठी आणि समजण्यासाठी अजून लहान आहेत. पण जेव्हा तुम्ही मुला-मुलींना जाड्या किंवा रंगावरुन काही बोलता किंवा त्यांचे अशाप्रकारचे फोटो सोशल मीडियात शेअर करता तेव्हा त्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. (Image Credit : Verywell Mind)

लहान मुलांची खाजगी माहिती - जर तुम्ही तुमच्या मुला-मुलींचे शाळेतील फोटो शेअर करत असाल किंवा अशा ठिकाणाचा जिथे ते एकटे राहतात. याने त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

टॉयलेटमधील फोटो - आपले खाजगी फोटो लिक होऊ नये किंवा ते शेअर केले जाऊ नये, तर तुमच्या मुला-मुलींना तरी असं का वाटेल? लहान मुलांचे बाथरुममधील फोटो किंवा अशाप्रकारचे फोटो सोशल मीडियात शेअर करणे घातक ठरु शकतं.