Honeymoon Diaries: लग्नानंतर हनिमूनला का जातात जोडपी? आजकाल लगेचच न जाण्याचा ट्रेंड जोर धरतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 02:14 PM2023-01-31T14:14:13+5:302023-01-31T14:20:53+5:30

लग्न ठरताच नवरा-नवरीमध्ये हनिमूनवरून चर्चा सुरु होते. कुठे जायचे? किती दिवस जायचे? पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की हनिमूनला का जायचे? नाही ना...

लग्न ठरताच नवरा-नवरीमध्ये हनिमूनवरून चर्चा सुरु होते. कुठे जायचे? किती दिवस जायचे? पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की हनिमूनला का जायचे? नाही ना... आजकाल तर लग्न झाले रे झाले की लगेचच नवविवाहित हनिमूनला जातात. ही प्रथा का आली, याची काही कारणे आहेत. चला जाणून घेऊयात...

लग्नाबाबत प्रत्येकाची स्वतःची स्वप्ने असतात. लग्न ठरल्याबरोबर लोक स्वप्नांच्या दुनियेत हरवून जातात आणि त्यांना सर्व काही सुंदर आणि रंगीबेरंगी वाटू लागते. लग्नाव्यतिरिक्त, जोडप्याला सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट म्हणजे हनिमून!

हनिमूनमध्येच एकमेकांसोबत निवांत वेळ घालवण्याची संधी मिळते. एकमेकांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळते. हनिमून म्हणजे पूर्वी पाश्चात्य संस्कृती मानली जात होती. परंतू आता ती भारतात एवढी रुळलीय की, नातेवाईकच नवजोडप्याला तिकिटे, हॉटेल बुकिंग आदी करून देत आहेत.

लग्नाचे विधीमध्ये खूप दमायला होते. त्यानंतर तासंतास रिसेप्शन आणि फोटोशुट आदीमुळे जोडपे दमून जाते. सकाळचा उत्साह सायंकाळपर्यंत चेहऱ्यावर राहत नाही. यानंतर तयारी सुरु होते ती, हनिमूनची. या कल्पनेनेच हे जोडपे ताजेतवाने होतात. लग्नात नातेवाईकांच्या गर्दीत जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ मिळत नाही, अशा परिस्थितीत हनिमून त्यांना स्वत:साठी वेळ आणि स्पेस देते.

हनिमून दरम्यान दोघेही एकमेकांना पूर्ण वेळ देतात. तुमच्या जोडीदारासोबत नवीन ठिकाणी एकट्याने वेळ घालवणे, फिरणे एकप्रकारे रिफ्रेश करून जाते. काही काळानंतर दोघेही आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होणार असतात. घरातले, मित्र-मैत्रिणी, काम आदींमध्ये त्यांना एकमेकांकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नसतो. अशा काळात हनिमूनचा रोमँटिकपणा या जोडप्याला सुखावतो.

हनिमूनकाळात जोडप्याला एकमेकांच्या सवयी कळतात, एकमेकांना ओळखता येते. हवं ते परिधान करणं, हवं ते खाणं, हवं तेव्हा झोपणं आणि उठणं, हवं तेव्हा इकडे तिकडे हिंडणं – बोलणं. नवविवाहित जोडप्याला आणखी काय हवं असतं.

आजकाल आणखी एक ट्रेंड जोर धरू लागला आहे आणि तो म्हणजे लग्नानंतर लगेचच हनिमूनला जाण्याऐवजी काही दिवस राहून हनिमूनला जातात. लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये संकोच निर्माण झालेला असतो. एकमेकांना लाजत असतात. तो बुजरेपणा दूर करण्यासाठी ते काही दिवस कुटुंबियांसोबत राहतात.

लग्नात खूप खर्च झाला असेल तर जोडपे आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते, अशा परिस्थितीत हनिमूनचा खर्च खिशावर ताण आणतो. यामुळे पुन्हा थोडे पैसे जमवून लोक काही दिवसांनी हनिमूनला जाण्यास पसंती देत आहेत.

नोकरदार असेल तर त्याला सुट्ट्यांचा देखील प्रॉब्लेम असतो. दोघेही नोकरी करत असतील तर लग्नाला बरीच सुट्टी लागलेली असते. यामुळे पुन्हा हनिमूनला सुट्टी लागणार असते. दोन-चार दिवसांसाठी हनिमूनला जाण्याने येये-जाजा होते. यामुळे काही दिवस थांबून पुन्हा मोठी सुट्टी काढता येते. यामुळे देखील हनिमूनला विलंब लावला जात आहे.