राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा 'गेम ओव्हर'! काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली ही 5 कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 02:27 PM2023-12-03T14:27:34+5:302023-12-03T15:06:28+5:30

INDIA आघाडीवरही काँग्रेसच्या या पराभवाचा परिणाम होईल असे जाणकारांचे मत आहे

Rajasthan Assembly Election Result, Congress: राजस्थान निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, सत्तेत असलेल्या काँग्रेसला जबर धक्का बसत असल्याचे चित्र आहे. तर सध्या विरोधी पक्षात असलेला भाजपा बहुमतासह सत्तेत परतताना दिसत आहे. सुरूवातीच्या कलानुसार, भाजप ११४ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला शंभरी गाठता आलेली नाही. जाणून घेऊया, काँग्रेसच्या पराभवाची पाच कारणे कोणती?

निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत काँग्रेस गटबाजीशी झुंजताना दिसत होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादाचाही कार्यकर्त्यांवर परिणाम होऊन जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला. निवडणुकीपूर्वीच दोन्ही नेते आम्ही एकत्र आहोत असा संदेश देताना दिसले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मोदी विरुद्ध गेहलोत अशी राजस्थानची निवडणूक काँग्रेसला महागात पडली. पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्याने काँग्रेसच्या जातनिहाय जनगणनेच्या हालचालीची धार बोथट केली. पंतप्रधान मोदींनी राजस्थानमध्ये अनेक प्रचंड मोठ्या निवडणूक रॅली घेतल्या. काँग्रेसमध्ये मात्र प्रचाराचा भार सीएम गेहलोत यांच्या खांद्यावर अधिक असल्याचे दिसून आले. राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले तेव्हा तेही फारसे आक्रमक झाल्याचे दिसले नाही. त्याचा फटका काँग्रेसला बसला.

राजस्थान निवडणुकीत भाजपने उदयपूरच्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा बराच उचलून धरला. भाजपची ही रणनीती प्रभावी ठरताना दिसली. मारवाड भागात उदयपूर येते. जो मेवाड जिंकतो तो राजस्थान जिंकतो असे राजस्थानच्या राजकारणात म्हटले जाते. भाजपला विजय मिळताना दिसत असेल, तर कन्हैयालाल खून प्रकरणासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दाही त्यांच्या विजयात महत्त्वाचा ठरला.

अशोक गेहलोत यांच्या सरकारने निवडणुकीच्या वर्षात एकापाठोपाठ एक हालचाली केल्या. चिरंजीवी योजनेंतर्गत त्यांनी आरोग्य विम्याची मर्यादा ५० लाखांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले. पण पेपर लीक, लाल डायरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे स्वस्त गॅस सिलिंडरसह अनेक फायदेशीर योजनांकडे जनतेचे दुर्लक्ष झाले.

काँग्रेसच्या पराभवामागे बंडखोर हेही मोठे कारण मानले जात आहे. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने अनेक नेत्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काहींनी भाजप आणि इतर पक्षांच्या तिकिटावर निवडणूकही लढवली. या बंडखोरांनी काँग्रेसलाही खिंडार पाडले आहे. याउलट भाजपने प्रत्येक बंडखोराला मनवण्याची जबाबदारी बड्या नेत्यांवर दिली आणि त्यांना मनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अनेक बंडखोरांनी सहमती दर्शवल्याने भाजपला याचा फायदा होताना दिसत आहे.