Gautami Patil: "मलाही काहींनी काठी मारली", सांगलीतील राड्यावर गौतमी पाटीलचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 04:51 PM2022-11-02T16:51:32+5:302022-11-02T17:04:10+5:30

गौतमी पाटील या तरूणीने आपल्या डान्सच्या अनोख्या शैलीने तरूणाईला आकर्षित केले आहे.

आजच्या सोशल मीडियाच्या जगात कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. याचाच प्रत्यय म्हणजे ग्रामीण भागातील तरूणांना आपल्या नृत्याने वेड लावणारी लावणीसम्राट गौतमी पाटील. गौतमी पाटील हे नाव ग्रामीण भागात खूप प्रसिद्ध झाले आहे.

खरं तर गौतमी पाटीलची प्रसिद्धी एवढी वाढली की तिच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे एका वृद्ध व्यक्तीला जीव गमवावा लागला. या कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलवर अश्लील नृत्य केल्याचा आरोप करण्यात येत असतानाच खुद्द गौतमीने पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका मांडली आहे.

सरकार तुम्ही मार्केट केलं जाम हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल हे पाहण्याजोगे असेल असे गौतमीने म्हटले. गौतमीने तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल म्हटले, "बरीच लोक सोशल मीडियावरून चुकीची माहिती पसरवतात. मी कोल्हापूरची नसून धुळे जिल्ह्यातील आहे, माझे मूळ गाव वाशिम असून तिथेच माझा जन्म झाला. मी इयत्ता आठवीत असताना पुण्यात आले. शिक्षण कमी झाले म्हणून डान्स क्षेत्राकडे वळले. घरच्या परिस्थितीमुळे डान्स करू लागले सुरूवातीला बॅक डान्सर होते."

महाराष्ट्रातील लावणीसम्राट सुरेखा पुणेकर यांनी देखील गौतमीच्या डान्सवर अश्लील नृत्य म्हणत आरोप केले होते. यावर देखील गौतमीने स्पष्टीकरण दिले आहे. माझ्याकडून चूक झाली ती मी मान्य केली. मी आता देखील माफी मागते इथून पुढे असे होणार नाही आणि मी असे केलेही नाही. अजिबात अश्लील डान्स केला नाही आताही व्यवस्थित सगळं सुरू आहे, अशा शब्दांत गौतमीने अश्लील डान्सचे आरोप फेटाळले.

अलीकडेच बेडग (ता. मिरज) येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रविवारी रात्री गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरूणाईने हजेरी लावली होती, त्यामुळे गर्दीत तुडवले गेल्याने दत्तात्रय विलास ओमासे (वय 44, मूळगाव यड्राव, इचलकरंजी, सध्या रा. बेडग) यांचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला. शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांनी शाळेच्या कौलांचा चुराडा केला. याबाबत प्रश्न विचारला असता गौतमीने म्हटले, "मी फक्त याबाबतची बातमी पाहिली. मला त्याचे वाईट वाढते. पण एवढी लोक जमतील याचा अजिबात अंदाज नव्हता. असे घडेल याची कल्पनाही नव्हती. तेव्हा नेमकं काय घडलं ते सांगता येणार नाही. मात्र शो संपल्यावर मला कळले की झाड तोडलं. आम्हाला पण काहींनी काठी मारली नशीब आम्ही वाचलो. झाडावर लोक चढली होती त्यामुळे झाडही पडले अशी घटना पहिल्यांदाच घडली."

सांगलीत झालेल्या राड्यात एका व्यक्तीच्या मृत्यूसह प्राथमिक शाळेचे देखील मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. शाळेच्या कौलांची तोडफोड करण्यात आली. या लावणी कार्यक्रमात मिरजेतील महापालिका शाळेतील मुख्याध्यापकांनी बेभान होऊन लावणीच्या तालावर नृत्य केले. मुख्याध्यापकांचा नृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.