महाराष्ट्र भाजपामध्ये खळबळ; पंकजा म्हणाल्या नाराज नाही, पण मुंडे-महाजन समर्थकांच्या मनात वेगळंच काही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 05:41 PM2021-07-10T17:41:55+5:302021-07-10T18:00:17+5:30

BJP Pankaja Munde: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रातील राजकीय चर्चा सुरू झाली आहे. प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेट विस्तार दिल्लीत पार पडला. या मंत्रिमंडळात जवळपास ४३ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. महाराष्ट्रातील ४ नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. यात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार यांना मंत्रिपदाची संधी मिळाली.

केंद्रीय मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे राज्यातील मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्याचेच पडसाद आता पाहायला मिळत आहे. बीडमध्ये आतापर्यंत १४ भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचं बोललं जातं होतं. परंतु त्यावर पंकजा मुंडे यांनी जाहीर खुलासा करत पक्षाचा निर्णय पटला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने पक्ष संघटनावाढीसाठी हा निर्णय घेतला. त्यात नाराज असल्याचं कारण नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

त्याचसोबत आमच्या पक्षात मी पण मान्य नाही, टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपाला मान्य नाही. भाजपाच्या संस्कृतीचा सन्मान करणारी मी कार्यकर्ता आहे. पक्षनिष्ठा बापाने मला संस्कारात दिली आहे. मुंडे-महाजन नेतृत्व करताना पक्ष शून्यातून इतका वाढला आहे. त्यामुळे पक्षासोबत आमचं प्रेमाचं नातं आहे असं त्यांनी सांगितले.

प्रीतम मुंडे अथवा पंकजा मुंडे यांनी कुणाकडेही मंत्रिपदाची मागणी केली नाही. महाराष्ट्रात कोणतंही पद आलं तरी मुंडे नाव चर्चेत येते. अनेक लोकांची नावं चर्चेत आली. लोकांचे प्रेम मुंडेसाहेबांवर आहे. त्यामुळे लोकं नाराज होतात. पक्षाच्या निर्णयावर कुठलीही आपत्ती नाही असंही पंकजा म्हणाल्या.

प्रीतम मुंडे निवडणुकीत उभं राहणार नाही अशी चर्चा होती. माझ्याकडे येणारी गर्दी पक्षाकडे येत असते. मी आणि पक्ष वेगळा आहे असं मी म्हणत नाही. बाकी कोणी म्हणत असेल तर माहिती नाही. नव्या मंत्रिमंडळात ज्यांचा समावेश झाला त्यांच्यामुळे १ मत जरी पक्षाचे वाढले तरी ते चांगले आहे असंही पंकजा मुंडेंनी सांगितले.

त्याचसोबत प्रीतम मुंडे राजकारणात मिरवण्यासाठी आल्या नाहीत. ती लोकांना शांत करण्यासाठी आली. मुंडेसाहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले त्यामुळे आज मी इथं आहे. मला आज कोणतंही पद दिलं तरी मुंडे साहेबांची उंची गाठण्यासाठी किमान ३०-३५ वर्ष लागतील असं म्हणाल्या.

दरम्यान पंकजा मुंडे यांनी नाराजी नाही असं म्हणत असल्या तरी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. राज्यात मुंडे-महाजन यांनी संघर्ष करून भाजपा वाढवली. मात्र आता काही मंडळी सोयीस्करपणे पंकजा मुंडें यांचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप कार्यकर्ते करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंडे समर्थकांचे सोशल मीडियावर विविध मेसेज फिरत आहेत. ४० विधानसभा मतदारसंघांत माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे भगिनींचा प्रभाव आहे. पक्षातील वरिष्ठांनी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना साथ द्यायला हवी; परंतु साथ न देता त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न चालू आहे. ताईंनी वेगळी भूमिका घ्यावी यासाठी आम्ही आग्रह करणार आहोत अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. परंतु मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मुंडे यांना मंत्री नाही केले तर काय झाले. ताई साहेब, आमच्या मनात आताही मंत्री आहेत. पक्ष काय इशारा देतो हे सांगायची गरज नाही राहिली. आता तरी ताईंनी वेगळा निर्णय घ्यावा अशी मागणी सोशल मीडियात होत आहे.

त्याचसोबत आता येणाऱ्या काही काळात मुंडे-महाजन समर्थकांची चिंतन आणि मंथन बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं सोशल मीडियातून सांगण्यात येत आहे. ही बैठक खरंच होणार का? कधी होणार? कोण आयोजित करणार? याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र सोशल मीडियावर हे मेसेज खूप व्हायरल होत आहेत.

पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नावर दिलेले उत्तरही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, तुम्ही लोकशाहीचा स्तंभ आहात, त्यामुळे आम्ही जे बघतो, आम्हाला दिसतं, त्याच्या पलीकडे तुम्हाला दिसतं. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय त्यावर पुढचे एक महिना अभ्यास करते आणि नंतर बघते काय करायचं असं जाहीरपणे म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांचे विधान, मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आणि सोशल मीडियावर मुंडे-महाजन चिंतन बैठक मेसेज या सर्व गोष्टींवरून नेमकं आगामी काळात काय घडणार? मुंडे समर्थकांच्या नाराजीचा फटका भाजपाला बसणार का? अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.