बिहारमध्ये आणखी एक राजकीय घडामोड; चिराग पासवान यांना तेजस्वी यादवांच्या RJD कडून मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 02:44 PM2021-06-14T14:44:53+5:302021-06-14T14:56:36+5:30

Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. जेडीयूला विरोध करणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोजपामधून ५ खासदार बाहेर पडत वेगळा गट बनवला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

लोकजनशक्ती पार्टीच्या सहा पैकी पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व बंडाळीचे नेतृत्व अन्य कुणी नाही तर रामविलास पासवान यांचे बंधू आणि चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस हे करत आहेत.

पशुपती पारस हे अलौली मतदारसंघातून पाचवेळी आमदार म्हणून निवडून आळे आहेत. त्यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून ते वेगवेगळ्या पक्षांमधून प्रवास केल्यानंतर आता लोकजनशक्ती पार्टीकडून निवडणूक लढवत होते. त्यांनी बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हाजीपूर मतदारसंघातून विजय मिळवत लोकसभेत प्रवेश केला होता. मिळत असलेल्या माहितीनुसार खासदार पशुपती पारस यांच्या नेतृत्वामध्ये पक्षातील अन्य चार खासदारही पक्षापासून वेगळे होण्याची तयारी करत आहेत. हे सर्व खासदार जेडीयूच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

पशुपती पारस यांचे नितीश कुमार यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते जेडीयूमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. मात्र पशुपती पारस यांनी बंडखोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. लोकजनशक्ती पार्टी रातोरात झालेल्या मोठ्या उलथापालथीनंतर आता खासदार चिराग पासवान(Chirag Paswan) यांना राजदनं मोठी ऑफर दिली आहे.

राजदचे ज्येष्ठ नेते भाई वीरेंद्र यांनी लोजपाच्या पक्ष फुटीवर भाष्य केले आहे. मनेरचे आमदार आणि राजदचे ज्येष्ठ नेते भाई वीरेंद्र यांनी चिराग पासवान यांना ऑफर देत त्यांना योग्य वेळ साधत तेजस्वी यादवसोबत एकत्र येण्याचं आवाहन केले आहे.

भाई वीरेंद्र म्हणाले की, चिराग पासवान आणि तेजस्वी यादव दोघंही युवा आहेत आणि हे दोघं युवक एकत्र आल्यास त्याचा मोठा परिणाम बिहारच्या राजकीय राजकारणात होऊ शकतो. लोकजनशक्ती पार्टीत कोणतीही फूट नाही. लोजपा समर्थक आजही रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांच्यासोबत आहेत.

जे लोक लोजपामध्ये फूट पाडतायेत त्यांना आमिष दाखवण्यात आलं आहे. जनता त्यांना धडा शिकवेल असं त्यांनी म्हटलं आहे. इतकचं नाही तर चिराग पासवान यांनी केंद्रीय राजकारण करावं तर तेजस्वी यादव बिहारमध्ये राजकारण करतील असं त्यांनी म्हटलं आहे.

लोकजनशक्ती पार्टीचे ६ खासदारांपैकी ५ खासदारांनी रातोरात उडी मारत चिराग पासवान यांचे काका पशुपति कुमार पारस यांना आपलं नेता मानलं आहे. तर दुसरी दुसरीकडे लोजपामधील फुटीमागे जेडीयूचा हात असल्याचं चिराग समर्थक सांगत आहेत.

लोजपाच्या फुटीवर जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी म्हटलंय की, जो जसं वागेल त्याला तसं फळ मिळेल. चिरागने जे रोवलं तेच उगवलं आहे. चिराग पासवान यांनी एनडीएविरोधात काम केले होते. त्यावरून त्यांच्या पक्षात विरोध होत होता. त्याचाच परिणाम म्हणून आता लोजपामध्ये फूट पडली आहे.

या काकांची समजूत घालण्यासाठी चिराग पासवान त्यांच्या घरी गेले आहेत. मात्र, गेटच उघडत नसल्याने त्यांना कारमध्येच हॉर्न वाजवत बसावे लागले होते. पारसदेखील घरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पुतण्याला काकांची वाट पाहून घरी जावे लागण्याची शक्यता आहे