Tokyo Olympics Pravin Jadhav : ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या प्रविण जाधवच्या कुटुंबीयांना मिळतेय धमकी; खेळाडूनं मागितली लष्कराकडे मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:29 PM2021-08-03T14:29:31+5:302021-08-03T14:32:32+5:30

Tokyo Olympics Pravin Jadhav : ऑलिम्पिक स्पर्धेतील पदार्पणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तिरंदाज प्रविण जाधव याच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून धमकावले जात आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय तिरंदाजांना पदकानं हुलकावणी दिली असली तरी. दीपिका कुमारी, अतनू दास आणि प्रविण जाधव यांनी प्रतिस्पर्धींना कडवी टक्कर दिली.

प्रविण जाधवनं पुरुष सांघिक फेरीत अतनू दास व तरुणदीप राय यांच्यापेक्षा सरस कामगिरी केली. मिश्र गटात त्यानं दीपिका कुमारीसोबत कौतुकास्पद कामगिरी केली, परंतु पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत त्याला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ब्रेडी एलिसनकडून पराभव पत्करावा लागला.

ऑलिम्पिकमधून परत आल्यानंतर प्रविणने मिळवलेल्या यश पाहवत नसलेल्या शेजारी त्याला धमकी देणारे फोन करत आहेत. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील साराडे गावातला प्रविण जाधव... एका झोपडी वजा घरात जाधव कुटुंबातील चार जण राहतात. प्रविण लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले.

प्रविणने सांगितले की, आम्ही घराची काही दुरुस्ती करणार आहोत, परंतु शेजाऱ्यांचा त्याला विरोध आहे. सकाळी पाच सहा जण आले आणि त्यांनी वडीलांना व काकांना धमकी दिली. यापूर्वीही त्यांनी असाच त्रास दिला होता. त्यांना एक स्वतंत्र मार्ग हवा आहे. ज्यावर आम्ही होकार दिला होता. पण आता त्यांनी मर्यादा सोडली. या घरात अनेक वर्षांपासून आम्ही राहत आहोत, आमच्याकडे सर्व कागदपत्र आहेत.

भारतीय तिरंदाज ऑलिम्पिकमधून थेट हरियाणातील सोनिपत येथे गेले आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ते तेथे सराव करणार आहेत. प्रविण म्हणाला, माझ्या कुटुंबीयांना त्रास होत आहे आणि मी तेथे त्यांच्या सोबत नाही. यासंदर्भात मी लष्करातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे, ते या गोष्टीत लक्ष घालतील.

प्रविणचे वडील हे मजूरी करतात आणि संकटावर मात करून प्रविणनं ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे. प्रविणही वडिलांप्रमाणे मजूरी करणार होता, परंतु शाळेत असताना शिक्षकांनी त्याला अॅथलेटिक्समध्ये भाग घेण्यास सांगितले.

अहमदनगर येथील क्रीडा प्रबोधिनीच्या हॉस्टेलमध्ये राहत असताना त्यानं तिरंदाजी निवडली आणि त्यानंतर त्याची निवड पुणे आर्मी इंस्टीट्यूटसाठी झाली.