CWG 2022:१३० कोटी देशवासीयांच्या अपेक्षांचा 'भार' समर्थपणे पेलणारे शिलेदार; भारतासाठी पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:49 PM2022-08-02T12:49:58+5:302022-08-02T13:01:07+5:30

भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये सर्वाधिक पदके वेटलिफ्टिंगमधून जिंकली आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने ३ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण सात पदके पटकावली आहेत.

भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात विक्रमी भार उचलून तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. चानूने २०१ किलो (८८+११३) एवढे वजन उचलून विजयावर शिक्कामोर्तब केला. विशेष म्हणजे तिची ही उचल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. ४९ किलो वजनी गटात पहिल्या प्रयत्नात ८४ किलो वजन उचलल्यानंतर तिने मोठी आघाडी घेतली आणि दुसऱ्या प्रयत्नात ८८ किलो वजन उचलून इतिहास रचला.

१९ वर्षीय युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे. पुरूषांच्या ६७ किलो वजनी गटात त्याने ही सुवर्ण किमया साधली. जेरेमी लालरिनुंगाने ३०० (१४०+१६० किलो) वजन उचलून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. जेरेमीने ४ वर्षांमध्ये तिसऱ्यांदा तिरंग्याची शान वाढवली असून २०१८ मध्ये देखील तो युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला होता. त्यामुळे आगामी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून देखील त्याच्याकडून पदकाची अपेक्षा असणार आहे.

सायकल रिक्षा चालवून आपले कुटुंब चालवणाऱ्या वडीलांच्या मुलाने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण भार उचलून एतिहास रचला आहे. पश्चिम बंगालच्या देऊलपूर गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अचिंता शेऊली याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. २०२१ च्या जुनिअर जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ७३ किलो वजनी गटात रौप्यपदक आणि राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील दोन सुवर्ण पदकांची त्याच्या नावावर नोंद आहे. अचिंताचे वडील सायकल रिक्षा चालवून कुटुंब सांभाळायचे, परंतु अचिंता इयत्ता ८वीत असताना त्याच्या वडीलांनी जगाचा निरोप घेतला. अचिंताने जीवनाशी संघर्ष करत सुवर्ण पदकापर्यंत मजल मारली.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा सुपुत्र संकेत महादेव सरगर याने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले. संकेतने वेटलिफ्टिंगमध्ये ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. शेवटच्या प्रयत्नापर्यंत संकेत आघाडीवर होता मात्र कोपराला झालेल्या दुखापतीमुळे त्याला १३९ वजन उचलता आले नाही. १ किलोच्या फरकाने प्रतिस्पर्धी खेळाडूने सुवर्णपदक पटकावले आणि संकेतला रौप्यवर समाधान मानावे लागले. संकेतने अलीकडेच सिंगापूर इंटरनॅशनलमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. संकेतचे वडील महादेव सरगर हे १९९० च्या कालावधीत सुरूवातीला ग्रामीण भागातून सांगलीत आले होते. उदरनिर्वाहासाठी त्यांनी पान शॉप, संकेत पान असा छोटा व्यवसाय सुरू केला होता.

भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये बिंद्यारानी देवीने वेटलिफ्टिंगमध्ये चौथे पदक जिंकले. महिलांच्या ५५ किलो वजनी गटात बिंद्यारानी देवीने रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. तिने क्लिन ॲंड जर्कमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजन उचलले. मणिपूरच्या या २३ वर्षीय वेटलिफ्टरने २०१९ च्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २०२१ मध्ये याच स्पर्धेत तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. तसेच २०२१ च्या जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत क्लिन ॲंड जर्कमध्ये तिने सुवर्ण जिंकले होते.

भारताचा वेटलिफ्टर गुरूराज पुजारीने ६१ किलो वजनी गटात एकूण २६९ वजन उचलले. त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याने या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. मराठमोळ्या संकेत सरगर पाठोपाठ गुरूराजने रौप्य पदकावर नाव कोरले. त्याने ६१ किलो वजनी गटात सर्वप्रथन १४४ किलो वजन उचलून यशस्वी सुरूवात केली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने आपल्याच पहिल्या प्रयत्नाला मागे टाकले आणि १४८ किलो वजन उचलले. अखेर तिसऱ्या प्रयत्नात गुरूराजने १५१ किलो वजनाची उचल केली आणि एकूण २६९ वजनासह कांस्यपदकाची कमाई केली.

हरजिंदर कौरने भारतासाठी नववे पदक जिंकले, जे वेटलिफ्टिंग खेळाडूंकडून मिळालेले सातवे पदक ठरले आहे. भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. वेटलिफ्टिंगच्या महिलांच्या ७१ किलो वजनी गटात हरजिंदर कौरने कांस्यपदक जिंकल्याने भारताची एकूण पदकांची संख्या ९ झाली आहे. ७१ किलो वजनी गटात हरजिंदर कौरला स्नॅच प्रकारात पहिल्या प्रयत्नात ९० किलो भार उचलण्यात अपयश आले, परंतु तिने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान पाहता तिने तिसऱ्या प्रयत्नात ९१ किलो लक्षात घेऊन दोन किलोंची वाढ केली आणि ९३ किलो वजन सहज उचलले. मात्र इंग्लंडच्या साराह डेव्हिसने १०३ किलो वजन उचलून इतिहास रचला आणि हरजिंदर कौरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.