Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:54 IST2025-10-07T18:45:06+5:302025-10-07T18:54:18+5:30

Navi Mumbai Airport Photos: गेल्या काही वर्षांची प्रतिक्षा संपली... ११६० हेक्टर परिसरात उभारण्यात आलेले नवी मुंबई विमानतळ अखेर सुरू होण्याला मुहूर्त मिळाला. या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे.

बहुप्रतिक्षित नवी मुंबई विमानतळावरून अखेर विमाने उड्डाण करताना आणि उतरताना दिसणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होईल आणि डिसेंबरमध्ये पहिले विमान उड्डाण करेल.

नवी मुंबई विमानतळाबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विमानतळ देशातील सर्वांत मोठ्या ग्रीनफिल्ड प्रकल्पांपैकी एक आहे. ११६० हेक्टर इतक्या मोठ्या जागेवर हा विमानतळ तयार केला गेला असून, पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची सेवा पुरविण्याची क्षमता आहे.

विमानतळ विकासाच्या अंतिम टप्प्यानंतर ही क्षमता ९० दशलक्षपर्यंत वाढणार आहे. यातून तीन वर्षांत १५ ते १८ हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. इतकंच नाही, तर पुढील दोन दशकांत हा आकडा एक लाखांवर जाईल.

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी होणार असले, तरी व्यावसायिक संचलनासाठी सुरक्षिततेची बाब म्हणून त्याचा ताबा सीआयएसएफकडे दिला जाणार आहे. साधारणतः दीड ते दोन महिन्यांनी म्हणजे डिसेंबरमध्ये येथून कार्गो आणि प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होणार आहे.

विमानतळाला चार मुख्य प्रवेशद्वार असून, तीन केंद्र असणार आहेत; ती म्हणजे अल्फा, ब्राव्हो आणि चार्ली. या केंद्रातून आंतरराष्ट्र्रीय आणि देशांतर्गत सर्व प्रवाशांचे व्यवस्थापन केले जाणार आहे. विमानतळावर ८८ चेक पाईंट्स आहेत.

८८ चेक पाईंट्सपैकी ६६ चेक पॉईंट्स हा सामान्यपणेच आहेत. इथे विमानतळ कंपन्यांचे अधिकारी प्रवाशांना बोर्डिंग पास आणि चेक इन करण्यासाठी मदत करतील. तर २२ चेक पॉईंट्सवर स्वतःच चेक ईन करण्यासाठी काऊंटर असणार आहेत.

नवी मुंबई विमानतळावरील सेवा डिसेंबरपासून सुरू होईल. सुरुवातीला अर्थात महिनाभर या विमानतळावरून सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंतच सेवा सुरू असणार म्हणजे विमानांचे उड्डाण आणि विमानांचे लॅण्डिंग. विमानतळाची ४० एटीएम (हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली) इतकी आहे. पण, सुरूवातीच्या टप्प्यात १० एटीएम सुरू केले जाणार आहे.

१० एटीएम प्रणाली कार्यान्वित असतील, याचा अर्थ तासाला १० विमानांनाच उतरण्याची किंवा उड्डाण करण्याची परवानगी दिली जाईल. विमान कंपन्यांकडून लवकरच नवी मुंबई विमानतळावरून सुरू होणाऱ्या सेवांची घोषणा केली जाणार आहे.

नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनस आणि दोन समांतर धावपट्ट्या असणार आहेत. पण, तूर्तास फक्त एक टर्मिनस आणि एकच धावपट्टी सुरू केली जाणार आहे. दुसऱ्या टर्मिनस उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विमानतळाचे दुसऱ्या टप्प्याच विस्तारिकरण करण्यासाठी अदानी समूह ३० हजार कोटी रुपये गुंतवणार आहे.

साडेतीन दशलक्ष टनांहून अधिक मालवाहतूक या विमानतळावरून होणार आहे. दोन समांतर धावपट्ट्या, कमलपुष्पावर आधारित अद्वितीय वास्तुरचना आणि स्वयंचलित पीपल मुव्हर प्रणाली आणि भूमिगत नेटवर्कद्वारे जोडले जाणारे चार टर्मिनल्स यामुळे हे विमानतळ आधुनिक तंत्रज्ञानाचे मॉडेल ठरणार आहे.