उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:15 IST2025-09-09T12:09:59+5:302025-09-09T12:15:11+5:30

उपराष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधकांचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. ९ सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यासाठी होत असलेल्या निवडणुकीची प्रक्रिया जाणून घ्या.

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ईव्हीएम का वापरली जात नाही? उत्तर : या निवडणुकीत लोकप्रतिनिधींना उमेदवारांसमोर पसंतीक्रम लिहावा लागतो- पहिली पसंती, दुसरी, तिसरी पसंती अशा स्वरूपात. मतमोजणी ही या पसंतीवर आधारित असते. अशी प्राथमिकताधारित मतमोजणी ईव्हीएम तंत्रज्ञानात शक्य नाही.

ईव्हीएम न वापरण्यामागे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे काय? उत्तर : अधिकाऱ्यांच्या मते, ईव्हीएमची रचना सरळ बहुमताने होणाऱ्या निवडणुकांसाठी केली आहे. उपराष्ट्रपती निवडणूक ही ‘प्रमाणानुसार प्रतिनिधित्व’ व ‘एकच हस्तांतरणीय मत’ या पद्धतीवर चालते. यासाठी वेगळी तंत्रज्ञानयुक्त ईव्हीएम तयार करावी लागेल.

मतमोजणीची प्रक्रिया कशी चालते? उत्तर : ज्या उमेदवाराला आवश्यक कोट्याइतकी मते मिळतात तो थेट विजयी ठरतो. तो कोटा गाठला नाही, तर सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीनुसार मते इतर उमेदवारांना हस्तांतरित केली जातात.

उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान कोण करतात? उत्तर : राज्यसभेतील २३३ निवडून आलेले सदस्य, राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित १२ सदस्य व लोकसभेतील ५४३ सदस्य या निवडणुकीत मतदान करतात. मतदानासाठी एकूण ७८८ सदस्य पात्र असतात. मात्र, प्रत्यक्षात किती सदस्य अस्तित्वात आहेत याची अंतिम गणना निवडणूक आयोग करतो.

प्रत्यक्षात मतदान कसे केले जाते? उत्तर : प्रत्येक मतदाराला (खासदाराला) मतपत्रिकेवर उमेदवारांसमोर १, २, ३ असे क्रमांक रोमन आकड्यांत लिहायचे असतात. हे क्रमांक उमेदवारांच्या पसंतीसाठी असतात. मतदान गुप्त ठेवले जाते. यासाठी निवडणूक आयोगाने पुरविलेला विशेष पेनच वापरावा लागतो.