पाकिस्तानात कुणी केला दाऊदवर विषप्रयोग?; 'या' लोकांभोवती फिरतेय संशयाची सुई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 01:34 PM2023-12-18T13:34:31+5:302023-12-18T13:39:09+5:30

भारतापासून पाकिस्तानापर्यंत सगळीकडे सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला. कराचीत मंत्र्यांपेक्षा जास्त सुरक्षेत राहणाऱ्या डॉनला अखेर विष कुणी दिले, यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे जिने दाऊदला त्याच्या घरातच विष दिले. या पाठिमागे पाकिस्तानचीच एजन्सी आहे की, भारत आणि अमेरिका यातील कुणाचा हात आहे? असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडले आहेत.

यात सर्वात मोठा संशय पाकिस्तानी सैन्यावरच जात आहे. दाऊदला विष दिल्याचे समोर आल्यानंतर काही लोक गेल्या २ वर्षात मारलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांशी हे जोडत आहेत. त्यात रियाज अहमद, शाहीद लतीफ, ख्वाजा शाहीद, अबु हंजाला यांच्या नावाचा समावेश आहे. ज्यातील काहींना विष देऊन मारून टाकले.

पाकिस्तानात लपलेले हे सर्व दहशतवादी भारताच्या मोस्ट वाँटेड यादीतील आहेत. ना पाकिस्तानने भारतावर आरोप केले, ना भारताने यावर काही स्पष्टीकरण दिले. परंतु भारताचे शत्रू एकएक करून ठार होत आहेत. दाऊद भारतातील मोस्ट वाँटेड असून त्याला विष दिल्याचे समोर आले तेव्हा दुसऱ्या दहशतवाद्यांच्या मृत्यूशी हे प्रकरण जोडले गेले.

दाऊदला विष देण्यामागे पाकिस्तानातील सर्वात ताकदवान संस्था, त्यांच्या सैन्यावरच संशयाची सुई फिरतेय. भारतीय तपास यंत्रणा दाऊदपर्यंत पोहचण्याच्या भीतीने पाकिस्तानी सैन्यानं हे केले असावे असं मानले जात आहे. जर भारतानं दाऊदला पकडले तर जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड होईल असं पाकिस्तानला वाटते. त्यामुळे पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयवर संशय जाण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे दिर्घकाळापासून दाऊद या दोघांच्या इशाऱ्यावर काम करतोय.त्यामुळे या दोन्ही संस्थांचे अनेक काळे कारनामे दाऊदकडे असतील. जे उघड होण्याच्या भीतीने दाऊदला मारण्याचा प्रयत्न केला असावा. अमेरिकाही दाऊदला मारण्याचा प्रयत्न करू शकते का? हा प्रश्नही आहे.

मात्र अमेरिकेच्या निशाण्यावर दाऊद कधी नव्हता ना दाऊदने अमेरिकेचे काही नुकसान केले. त्यामुळे अमेरिका त्याच्यासाठी इतकी रिस्क घेईल हे कठीण वाटते. अशावेळी पाकिस्तानी सैन्यावर सर्वात जास्त संशय आहे. दाऊदबाबत बोलायचे झाले तर तो पत्नीमुलांसह पाकिस्तानात राहतोय. १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊदने भारत सोडले होते.

दाऊद पाकिस्तानातील कराची इथं एका मोठ्या बंगल्यात राहतो. ९० मध्ये त्याने मुंबई राहणाऱ्या मेहजबीनसोबत निकाह केला. या दोघांना ४ मुले आहेत. सर्वात छोट्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर २ मुलींचे आणि एका मुलाचे लग्न पाकिस्तानातच झाले आहे. दाऊदने पाकिस्तानात दुसरा विवाह केल्याचेही बोलले जाते.

यावर्षी जानेवारी महिन्यात दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने एनआयएसमोर दावा केला की, दाऊदने पाकिस्तानात एका महिलेसोबत दुसरे लग्न केले असून तो पाकिस्तानात वास्तव्यास आहे. दाऊदला विष दिल्याच्या बातमीबाबत मुंबई पोलीस त्याच्या नातेवाईकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोशल मीडियात होत असलेल्या दाव्यानुसार, दाऊदला एका अज्ञात व्यक्तीने कराचीत विष दिले त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊद गँगच्या माजी सहकाऱ्याने याची पुष्टी करत दाऊद गंभीर अवस्थेत कराचीत हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. २ दिवसापूर्वी त्याला इथं दाखल करण्यात आल्याचे म्हटलं.

दाऊदला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाऊद आहे तिथे कुणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ वरिष्ठ अधिकारी आणि निकटवर्तीयांनाच आत प्रवेश आहे. याआधीही अनेकदा दाऊद अनेक आजारांपासून ग्रस्त असल्याचा दावा करण्यात आला होता