West Bengal Election 2021: ममता दीदींना पराभूत करणारे शुभेंदू अधिकारी कोण आहेत?; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:31 PM2021-05-03T12:31:03+5:302021-05-03T14:41:39+5:30

West Bengal Election 2021: कधीकाळी तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे शुभेंदू अधिकारी आता त्यांचे सर्वांत कट्टर विरोधक बनले आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेस पक्षानं बहुमताचा आकडा गाढला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदार संघात पराभव झाला आहे. भाजपाच्या शुभेंदू अधिकारी यांच्याविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा निसटता पराभव झाला. खुद्द ममता बॅनर्जी यांनीही नंदीग्राममधील पराभव मान्य केला आहे. (West Bengal Election 2021 Mamta banerjee lost the Nandigram seat shubhendu adhikari won)

नंदीग्रामच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच ममता बॅनर्जी आणि शुभेंदु अधिकारी यांच्यात आघाडी-पिछाडीचा खेळ सुरूच होता. एक वेळ तर ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचीही माहिती समोर आली होती. पण अखेरच्या फेरीनंतर शुभेंदु अधिकारी यांनी १९५६ मतांनी बाजी मारली. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी नंदीग्रामच्या लढतीत मुख्यमंत्री ममता दीदी यांना पराभवाचा धक्का बसला.

कधीकाळी तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे शुभेंदू अधिकारी आता त्यांचे सर्वांत कट्टर विरोधक बनले आहेत. अगदी विरुद्ध टोकाचा हा प्रवास राजकारणात बऱ्याचदा पहायला मिळतो. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो आणि कोणाचा शत्रूही नसतो. शुभेंदू यांची दोन्ही विधानं या म्हणीचं प्रत्यक्ष दर्शन घडवतात.

पहिल्यांदा आमदार, नंतर दोन वेळा खासदार आणि गेल्यावेळी नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकून ममता बॅनर्जी सरकारमध्ये परिवहन मंत्री बनलेल्या शुभेंदू अधिकारी यांचं नाव काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या बाहेर फार जणांना माहीत नव्हतं.

मात्र घटना वेगानं घडल्या आणि शुभेंदू अधिकारी डिसेंबर २०२०मध्ये भाजपामध्ये गेले. त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जींनाच नंदीग्राममधून आव्हान दिलं. त्यानंतर शुभेंदू यांचं नाव देशातच नाही परदेशी माध्यमांमध्येही प्रसिद्ध झालं.

नंदीग्रामला रसायन कंपनीला देण्यात आलेल्या जमिनींच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनात, २००७ साली शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूलच्या फळीचे नेतृत्त्व केले, एवढीच त्यांची सध्या देशाला माहिती असलेली ओळख. प्रत्यक्षात त्या आधीपासून अधिकारी घराणे राजकारणात आहे.

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाशिवाय तामलूक व कंठी हे दोन लोकसभा मतदारसंघ या घराण्याच्या ताब्यात आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री राहिलेले कंठी लोकसभा मतदारसंघाचे २००९ पासूनचे तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशीर कुमार अधिकारी हे शुभेंदू अधिकारी यांचे पिताश्री. शुभेंदू यांचे बंधू व शिशीर अधिकारी यांचे दुसरे चिरंजीव तामलूक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

शुभेंदू अधिकारी यांच्या बंडानंतर खा. शिशीर कुमार चौधरी यांना महत्वाच्या पदावरून तृणमूल काँग्रेसने दूर केले. बंधू सौमेंदू यांनाही कंठी नगरपालिकेतील पद सोडावे लागले.

८० वर्षांचे शिशीर कुमार अधिकारी १९८२ मध्ये पहिल्यांदा आमदार होण्याआधी तब्बल पंचवीस वर्षे कंठीचे नगराध्यक्ष होते. डाव्या पक्षांचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे काँग्रेसशी जुळलेल्या अधिकारी घराण्याला नंतरची काही वर्षे त्यांना राजकीय यश मिळाले नाही. परंतु, तृणमूल काँग्रेस प्रबळ बनताच २००६ पासून पुन्हा त्यांचे नशीब फुलले. आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदांची रास जणू अंगणात लागली.

वडिलांनंतर, भावाच्या आधी शुभेंदू अधिकारी हेदेखील खासदार होते. २००७ मधील जमिनींसाठी रक्तरंजित संघर्ष, गोळीबारात मरण पावलेले १४ शेतकरी, आक्रमक ममता बॅनर्जीं या बळावर ते २००९ व २०१४ असे दोनवेळा तामलूक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

२०१६ मध्ये दुसऱ्यांदा तृणमूल काँग्रेसेच सरकार प. बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला व ते आमदार व सोबतच परिवहन व पर्यावरण खात्याचे मंत्री बनले. बंधू दिव्येंदू पोटनिवडणुकीत त्यांच्या जागी लोकसभेवर निवडून गेले. त्याआधी १९८० पासून हा लोकसभा मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला होता.

निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी शुभेंदू यांनी नंदीग्रामला 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आणलं आहे. हा राज्यातला सर्वांत हाय प्रोफाइल मतदारसंघ बनला आहे. त्याचे परिणाम बंगालच्या भविष्यातील राजकारणावर नक्कीच होऊ शकतात.