देशात पहिल्यांदाच पार पडला तृतीयपंथाचा सामूहिक विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 02:59 PM2019-04-01T14:59:32+5:302019-04-01T15:04:06+5:30

रायपूरमध्ये पार पडलेला हा विवाह सोहळा विशेष होता. या सामुहिक विवाह सोहळ्याचं महत्त्व जाणून गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली आहे.

देशात समलैंगिकतेला मान्यता मिळाल्यानंतर पहिल्यांदाच रायपूर येथे तृतीयपंथीयांचा सामुहिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये घोड्यावरून आलेल्या 15 नवरदेव मंडळींनी तृतीयपंथांशी लग्न केलं. हे लग्न बघण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.

लग्नात तृतीयपंथी वऱ्हाडी मंडळींनी ढोलताशाच्या ठेक्यात अनेकांनी डान्स केला. त्यांच्यासाठी सार्वजनिक स्वरुपात असा आनंदाचा क्षण किंबहुना पहिल्यांदाच आला असेल त्यामुळे या विवाह सोहळ्याला महत्त्व आहे. नेहमी इतरांच्या लग्नात येऊन नाचणाऱ्या तृतीयपंथी समुदाय स्वत:च्या लग्नात मनसोक्त नाचले,

या लग्नाचं खास आकर्षण होतं ते म्हणजे देशातील पहिला मिस ट्रान्स क्वीन वीणा शेंद्रे हिचं. या लग्न सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून वीणा उपस्थित होती. वीणाला पाहून अनेक युवकांना तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

हिंदू प्रथा परंपरेनुसार तृतीयपंथियांचे लग्न पार पडले असून पुरूषांनी आपल्या जोडीदाराच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं,या लग्नाला उपस्थित राहून अनेकांनी जोडप्यांना आशीर्वाद दिले. या लग्नात छत्तीसगडच्या 7 जोडप्यांसह महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार याठिकाणहून जोडपे आले होते.