Cowin App: ...तर कोविन ऍप तुम्हाला करेल ब्लॉक; स्लॉट बूक करताना 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 12:03 PM2021-06-10T12:03:27+5:302021-06-10T12:07:56+5:30

Cowin App: कोविन ऍप वापरताना 'या' चुका टाळा; अन्यथा ऍप करेल ब्लॉक

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या खाली आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानं काहीसा दिलासा मिळाला असला, तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असल्यास लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे.

सध्या देशात काही ठिकाणी कोरोना लसींची टंचाई असल्यानं लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे. कोरोना लस मिळवण्यासाठी अनेक जण कोविन किंवा आरोग्यसेतू ऍपचा वापर करतात.

कोविन ऍपच्या माध्यमातून वापरकर्ते त्यांच्या लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका स्वत:च चुका दुरुस्त करू शकतात. तशी सुविधा आता कोविनवर देण्यात आली आहे. मात्र कोविन ऍप वापरताना चुका केल्यास तुम्ही ब्लॉकदेखील होऊ शकता.

२४ तासांच्या आत कोविन प्लॅटफॉर्मवर लसीच्या स्लॉटसाठी १ हजार वेळा सर्च केल्यास तुम्हाला ब्लॉक करण्यात येईल.

२४ तासांच्या अवधीत ५० पेक्षा अधिक वेळा ओटीपी जनरेट केल्यासही वापरकर्त्यांना ब्लॉक करण्यात येईल. कोविन पोर्टलचं व्यवस्थापन पाहणाऱ्या टीमच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

२४ तासांमध्ये कोविन प्लॅटफॉर्मवर लसीच्या स्लॉटसाठी १ हजार वेळा सर्च केल्यास, ५० पेक्षा अधिक वेळा ओटीपी जनरेट केल्यास वापरकर्त्याला २४ तासांसाठी ब्लॉक करण्यात येईल.

१५ मिनिटांमध्ये २० पेक्षा अधिक वेळा लसीचा स्लॉट सर्च केल्यास तुम्ही पोर्टलवरून आपोआप लॉग आऊट व्हाल.

लसीकरणासाठी स्लॉट बुक करताना सर्वसामान्यांना बॉट्सचा सामना करावा लागू नये यासाठी कोविन व्यवस्थापन करणाऱ्या पथकानं हे पाऊल उचललं आहे.

एक किंवा दोन पिन कोड किंवा जिल्ह्यात १५ मिनिटांच्या आत २० वेळा सर्च केल्यानं बॉट्सचा संशय येतो. त्यामुळे अशा वापरकर्त्यांना लॉग आऊट करण्यात येतं.