तेव्हा मल्लिकार्जुन खर्गेंनी केलं होतं इंदिरा गांधींविरोधात बंड, सोडला होता पक्ष, नंतर असे बनले गांधी कुटुंबाचे विश्वासू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 02:57 PM2022-10-19T14:57:30+5:302022-10-19T15:07:11+5:30

mallikarjun kharge: दरम्यान, कर्नाटकमधून येणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या राजकीय कारकीर्दीची कमान ही उत्तरोत्तर चढती राहिली आहे. गेल्या काही काळात ते गांधी कुटुंबीयांचे विश्वासू बनले आहेत. मात्र एकेकाळी त्यांनी इंदिरा गांधींविरोधात बंड केले होते. तसेच पक्षही सोडला होता.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या अध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. आता जवळपास २४ वर्षांनंतर खर्गे हे गांधी कुटुंबाबाहेरचे अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळतील.

दरम्यान, कर्नाटकमधून येणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या राजकीय कारकीर्दीची कमान ही उत्तरोत्तर चढती राहिली आहे. गेल्या काही काळात ते गांधी कुटुंबीयांचे विश्वासू बनले आहेत. मात्र एकेकाळी त्यांनी इंदिरा गांधींविरोधात बंड केले होते. तसेच पक्षही सोडला होता.

खर्गे यांनी ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत १२ निवडणुका लढवल्या. त्यापैकी ११ मध्ये त्यांना विजय मिळाला. जवळपास ३२ वर्षे ते एकाच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत होते.

कर्नाटकच्या राजकारणामध्ये तीन वेळा त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी आली. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाने हुलकावलणी दिली. मात्र त्यामुळे त्यांना हायकमांडवर नाराजी न दर्शवता पक्षाप्रति आपली निष्ठा कायम राखली.

मात्र खर्गे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांनी इंदिरा गांधींविरोधात बंड पुकारले होते. त्यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे राजकीय गुरू आणि माजी मुख्यमंत्री देवराज अर्स यांना साथ दिली होती. तसेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र काही काळातच ते काँग्रेसमध्ये परतले होते.

१९६९ मध्ये काँग्रेमध्ये दोन गट पडले तेव्हा मल्लिकार्जुन खर्गे हे इंदिर गांधींसोबत होते. १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत देवराज अर्स यांच्या नेतृत्वाखालील इंदिरा गांधी गटाच्या काँग्रेस (आर) ने दणदणीत विजय मिळवला होता. खर्गेही निवडून आले होते. मात्र कालांतराने अर्स आणि इंदिरा गांधी यांच्यात मतभेद झाले.

१९७९ मध्ये अर्स यांनी काँग्रेस सोडली होती. तेव्हा त्यांच्यासोबत मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र पुढच्या लोकसभा निवडणुकीत अर्स यांच्या पक्षाला राज्यात केवळ एकच जागा जिंकता आली. तसेच त्यांच्या नेतृत्वाबाबत सहकाऱ्यांचा अपेक्षाभंग होऊ लागला. त्याकाळात मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसमध्ये माघारी परतले. त्यानंतर मात्र त्यांनी पक्षाशी एकनिष्ठता बाळगली.

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. तेव्हा गुलबर्गा येथून निवडून आलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या लोकसभेतील नेतेपदी निवड करण्यात आली होती.

त्यानंतर आता अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतल्यावर मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पुढे आलं. तसेच ते मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले.