दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 09:31 IST2025-04-28T09:27:26+5:302025-04-28T09:31:52+5:30

गेल्या तीन दशकांपासून भारत पाकिस्तानने पोसलेला दहशतवाद सहन करत आहे. कित्येक हल्ले झाले आहेत, कित्येक जवान शहीद झाले आहेत. या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच नाही तर भारतभरात हल्ले केले आहेत. पाकिस्तान कंगाल झाला आहेच, परंतू यामुळे भारतालाही बलिदानासोबत प्रचंड पैसाही खर्च करावा लागला आहे. हाच पैसा जर विकासावर खर्च करता आला असता तर आज भारत अमेरिकेच्याही पुढे गेला असता.
गेल्या ३२ वर्षांत भारताने किती दहशतवादी मारले आणि यासाठी किती जवान धारातीर्थी पडले याची आकडेवारी आली आहे. पाकिस्तानने जवळपास 23,386 हून अधिक दहशतवादी निर्माण केले, कारण भारताने 23,386 एवढे दहशतवादी मारले आहेत.
एवढ्या प्रचंड प्रमाणावर दहशतवाद्यांचे निर्माण करूनही पाकिस्तान थकलेला नाही. कित्येक घरातील तरुण रक्त पाकिस्तानने संपविले आहे. इंस्टीट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट मैनेजमेंटने यावर अभ्यास केला आहे. त्यांच्या अहवालानुसार नऊ राज्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी संवेदनशील आहेत.
१९८८ पासून २०१९ पर्यंत देशात तब्बल ५६ हजार दहशतवादी हल्ले झाले आहेत. या काळात भारतीय सैन्याने, पोलिसांनी 23,386 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
या काळातील दहशतवादी हल्ल्यात थोडे थोडके नव्हे तर 14,930 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दहशतवाद्यांचे हल्ले परतवून लावताना 6,413 जवान शहीद झाले आहेत.
६ मार्च २००० ते २२ एप्रिल २०२५ पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये १२,०३७ दहशतवादी घटनांमध्ये ४,९८० निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पहलगाम हल्ला घडवून आणणारी दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ही घाटीत कलम ३७० रद्द करण्याच्या काळात अस्तित्वात आली. तेव्हापासून त्यांचे लक्ष्य भारतीय नागरिक आहेत. या संघटनेने ३२ हल्ले केले आहेत. ज्यात ४८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
सीझफायर...
पाकिस्तानने गेल्या १६ वर्षांत ९०१४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये ५९ भारतीय नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, तर सैन्याचे ५७ जवान व निमलष्करी दलाचे ४२ जवान शहीद झाले आहेत.
घुसखोरी...
याचबरोबर पाकिस्तानने २००१ ते २०१९ पर्यंत ११ हजार वेळा घुसखोरी केली आहे, यानंतर १२००० दहशतवादी हल्ले झाले आहेत.