अफगाणिस्तानशी लढणाऱ्या पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; NOTAM जारी, पुढील ४८ तासांत भारतीय हवाई दल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:11 IST2026-03-03T12:02:50+5:302026-03-03T12:11:44+5:30

अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्यानंतर आक्रमक इराणने आखाती देशांमधील अमेरिकन सैन्य तळांना टार्गेट केले आहे. त्याशिवाय इस्रायलसह ११ देशांमध्ये सातत्याने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरू ठेवलेत. या संघर्षामुळे मध्य पूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मध्य पूर्वेत हा तणाव सुरू असताना दुसरीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातही युद्ध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानी आणि पाकिस्तानी सैन्यात संघर्ष सुरू आहे. त्यात अफगाणिस्तानातील तालिबानी सैन्याने पाकिस्तानातील नूर खान एअरबेससह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यामुळे या दोन्ही देशात तणाव वाढला आहे.

मध्य पूर्वेतील परिस्थिती आणि अफगाणिस्तानशी संघर्ष यातच पाकिस्तानसाठी आणखी एक टेन्शन देणारी बातमी पुढे आली आहे. भारतीय हवाई दलाने एक संदेश जारी केला आहे. ज्यात ५ मार्च ते १२ मार्च या काळात पाकिस्तानच्या सीमेपासून दक्षिणेकडे भारतीय हवाई दल युद्ध सराव करणार आहे. त्यासाठी नोटीस टू एअरमेन(NOTAM) जारी करण्यात आला आहे. अधिकृतपणे हा नियमित सैन्य सराव आहे परंतु भारताच्या या पाऊलाने इस्लामाबादची चिंता वाढवली आहे.

अधिकृत विमान वाहतूक अधिसूचनेनुसार, हे तात्पुरते हवाई क्षेत्र भारतीय हवाई दलाच्या सरावासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. अशा सूचना सामान्यतः लष्करी सरावांपूर्वी जारी केल्या जातात. जेणेकरून नागरी विमान या क्षेत्रापासून दूर राहतील. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानी वर्तुळात खळबळ माजली आहे. ज्याला आधीच अनेक आघाड्यांवर संकटाचा सामना करावा लागत आहे.

भारताच्या या घोषणेनंतर पाकिस्ताननेही त्यांच्याकडून अतिरिक्त सैन्य आणि हवाई साहित्य या भागात तैनात केले आहे. जेणेकरून भारतीय सरावावर लक्ष ठेवता येईल. पाकिस्तानी सैन्य आधीच दबावाखाली काम करत आहे. कारण त्यांना एकाचवेळी अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था सांभाळावी लागत आहे. अफगाणिस्तानसोबत युद्धामुळे पाकिस्तानी सैन्याचे कंबरडे मोडले आहे.

भारत पाकिस्तान सीमेचा दक्षिण भाग हा राजस्थान आणि पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या आसपास आहे. याधीही बऱ्याचदा या भागात सैन्य सराव झाले आहेत. जेव्हा जेव्हा या दोन्ही देशातील तणाव वाढतो तेव्हा या भागातील हालचाली वाढतात. ५ ते १२ मार्च हा सराव अशावेळी होत आहे जेव्हा पश्चिम आशियात सध्या तणावाची स्थिती उद्भवली आहे.

या भागात सुरू असलेल्या संघर्षाचा हवाई वाहतूक आणि लष्करी तयारीवरही परिणाम झाला आहे. ऑपरेशन सिंदूरपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये अशी पाऊले आता सामान्य झाली आहेत. दोन्ही देश वेळोवेळी सीमेजवळ लष्करी सराव करतात आणि त्यांचे हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्याच्या सूचना जारी करतात. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे याला महत्त्वही प्राप्त झाले आहे.

अलीकडेच तालिबानी सैन्याने रावलपिंडीतील नूर खान एअरबेसवर पाकिस्तानी कमांड आणि कंट्रोल सेंटरला टार्गेट करून ड्रोन हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. तालिबानचा हा हल्ला पाकिस्तानच्या जिव्हारी लागला. नूर खान एअरबेस पाकिस्तानच्या महत्त्वाच्या मिलिट्री तळांपैकी एक आहे.

ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय सैन्यानेही नूर खान एअरबेसवर टार्गेट हल्ला केला होता. मे २०२५ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ४ दिवस सैन्य संघर्ष सुरू होता. यात भारताने नूर खान एअरबेसला टार्गेट करून तिथे मोठे नुकसान केले. मागील ९ महिन्यापासून या एअरबेसवर दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यात तालिबानच्या हल्ल्यानंतर पुन्हा इथे नुकसान झाले आणि सोबतच दुरुस्तीच्या कामालाही धोका निर्माण झाला.

त्यात अमेरिका इस्रायल यांनी मिळून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार केले. या हल्ल्यामुळे शिया समुदायातील लोक रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानात सर्वाधिक शिया मुस्लीम राहतात. खामेनेई यांच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानात तीव्रतेने उमटले. इथल्या नागरिकांनी अमेरिकन दूतावासावर हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तान सध्या अफगाणिस्तान आणि देशातंर्गत संघर्ष या दुहेरी चक्रव्यूहात सापडला आहे. त्यात भारतीय हवाई दलाचा सराव पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरला आहे.

















