Taj Mahal: ताजमहलच्या 'त्या' 22 खोल्यांमध्ये कुठलं रहस्य दडलंय..? कधी सुरू झाला वाद..?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 03:22 PM2022-05-09T15:22:06+5:302022-05-09T15:27:29+5:30

Taj Mahal: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली असून, ताजमहालच्या खाली असलेल्या 22 खोल्या उघडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद-काशी विश्वनाथ मंदिर वादानंतर आता आग्र्याचा ताजमहालही चर्चेत आला आहे. ताजमहालाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली. याचिकेत ताजमहालमधील 22 खोल्या उघडण्यात याव्यात, जेणेकरून आतमध्ये देवदेवतांच्या मूर्ती आणि शिलालेख आहेत की नाही हे कळू शकेल, असे म्हटले होते.

फारसी, भारतीय आणि इस्लामिक वास्तुकलेच्या अनोख्या शैलीने बनलेला ताजमहाल प्रेमाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. असा दावा केला जातो की मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला होता. यमुनेच्या काठावर संगमरवरी दगडामध्ये बांधलेला ताजमहल जितका सुंदर आहे, तितकेच त्यात गुढ रहस्त दडलेले आहेत.

ताजमहाल मूळात तेजो महालय आहे आणि हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे, असा दावा अनेकदा करण्यात आलाय. असाच दावा आता पुन्हा एकदा करण्यात येतोय. अयोध्येमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात भाजपचे मीडिया प्रभारी रजनीश सिंह यांनी याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्याने मागणी केली आहे की भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला ताजमहालच्या आत 22 खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून तेथे हिंदू शिल्प आणि शिलालेख आहेत की नाही हे कळू शकेल. रजनीश सिंह यांचे वकील रुद्र विक्रम सिंह यांनी युक्तिवाद केला की, 1600 मध्ये आलेल्या सर्व प्रवाशांनी त्यांच्या प्रवास वर्णनात मानसिंगच्या राजवाड्याचा उल्लेख केला आहे.

वकील रुद्र विक्रम सिंह यांनी सांगितले की, ताजमहाल 1653 मध्ये बांधण्यात आला होता. पण, 1651 मधील औरंगजेबचे एक पत्र आहे, ज्यात त्याने लिहिले होते की, अम्मीच्या थडग्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अशा सर्व तथ्यांच्या आधारे ताजमहाल तपासण्याची गरज आहे.

सरकारने एएसआय आणि इतिहासकारांचा समावेश असलेली तथ्य शोध समिती स्थापन करून या प्रकरणी अहवाल सादर करावा, अशी मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. ही याचिका दाखल होताच राजकारण तापले आहे. भाजप इकप मुद्दे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील तपस्वी शिबिरातील पीठाधीश्‍वर आचार्य परमहंस यांनाही अयोध्येला जाण्यापासून रोखण्यात आले होते. याआधीही काही हिंदू पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ताजमहालच्या आत हनुमान चालीसा वाचल्याने वाद वाढला होता. इतिहासकार पीएन ओक यांच्या 'ट्रू स्टोरी ऑफ ताज' या पुस्तकावरुन ताजमहालचा वाद सुरू झाला.

या पुस्तकात ताजमहाल हे शिवमंदिर असल्याबाबत अनेक दावे करण्यात आले होते. काही इतिहासकारांचा दावा आहे की ताजमहालमधील मुख्य समाधी आणि चमेलीच्या मजल्याखाली 22 खोल्या आहेत, ज्या बंद करण्यात आल्या आहेत.

यमुनेच्या बाजूने तळघरात जाण्यासाठी चमेलीच्या माळावर दोन ठिकाणी पायऱ्या आहेत असे इतिहासकारांचे मत आहे. त्यावर लोखंडी जाळी लावून ते बंद करण्यात आले आहेत. सुमारे 45 वर्षांपूर्वीपर्यंत पायऱ्या उतरून जाण्याचा मार्ग खुला होता. या 22 खोल्या उघडण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.