Gyanvapi Mosque Case: कलश, शिवलिंग, अन् ..; ज्ञानवापी मस्जिदीच्या सर्व्हेत काय काय सापडल्याचा दावा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 01:08 PM2022-05-16T13:08:09+5:302022-05-16T13:13:03+5:30

वाराणसीच्या ज्ञानवापी मस्जिदीत गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व्हेचं काम संपलेले आहे. तिसऱ्या दिवशीच्या सर्व्हेत नंदीच्या मूर्तीजवळ असलेल्या विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाच्या वकिलांनी केला आहे. तर मुस्लीम पक्षाने हा दावा फेटळला आहे.

तिसऱ्या दिवशीच्या सर्व्हेत प्राचीन विहिरीची व्हिडीओग्राफी करत त्यात वॉटर प्रुफ कॅमेरा टाकला होता. तिसऱ्या दिवशी सर्व्हेचं काम संपलं आहे. या ३ दिवसांत ज्ञानवापी मस्जिदीच्या भूमिगत जागेपासून घुमट आणि भितींची पडताळणी केली. आता पुरावा म्हणून हे कोर्टात सादर करणार आहेत.

दरम्यान, हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी दावा केला की, ज्ञानवापीच्या वाजुखानामध्ये १२ फूट ८ इंच शिवलिंग सापडले आहे. हे शिवलिंग नंदीजींच्या समोर आहे आणि संपूर्ण पाणी बाहेर काढल्यावर दिसले, शिवलिंग १२ फूट ८ इंच आहे, जे आत खोल आहे, शिवलिंग सापडल्यावर लोकांनी उड्या मारल्या आणि हर हर महादेवचा जयघोष केला.

फिर्यादी महिला लक्ष्मीदेवीचे पती आणि पाहणी पथकाचे सदस्य सोहनलाल आर्य यांनी सांगितले की, आज बाबा सापडले आहेत, मी यापेक्षा अधिक काही बोलणार नाही, इतिहासकारांनी जे लिहिले होते ते त्यांना सापडले आहे, नंदी ज्याची प्रतिक्षा करत होता ते भोले बाबा सापडले.

जे आम्हाला वाटले होते त्यापेक्षा जास्त परिणाम मिळाले आहेत, त्यानंतर आम्ही पश्चिम भिंतीतील ७५ फूट लांब आणि ३५ फूट उंच ढिगाऱ्याची तपासणी करण्याची मागणी करू. ज्ञानवापी मस्जिदीचं सत्य कायद्याच्या दस्तावेजात नोंद झाले आहे. सर्व फोटो कॅमेऱ्यात कैद आहेत.

तळघर ते घुमटापर्यंतचा व्हिडिओ तयार केला आहे. सर्वेक्षणाचे काम तीन टप्प्यांत झाले. आता सत्याची प्रतीक्षा आहे. आज सर्वेक्षणाचा अंतिम टप्पा होता. सकाळी ८ वाजताच पाहणी पथक ज्ञानवापी मशिदीत पोहोचले. आज उरलेले २० टक्के काम पूर्ण झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदीसमोर बांधलेल्या विहिरीचे सर्वेक्षण करण्यात आले. विहिरीत वॉटरप्रुफ कॅमेरा लावून आत व्हिडिओग्राफीही करण्यात आली. १४ मे रोजी ज्ञानवापी मशिदीच्या आत सर्वेक्षण करण्यात आले.

पहिल्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सर्वेक्षण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सर्व ४ तळघरांचे कुलूप उघडून सर्वेक्षण करण्यात आले. १५ मे रोजी सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा झाला. दुसऱ्या दिवशीही चार तास सर्वेक्षणाचे काम चालले, मात्र कागदोपत्री काम असल्याने सर्वेक्षण पथक दीड तास उशिराने बाहेर पडले.

दुसऱ्या टप्प्यात घुमट, नमाज स्थळ, वजू स्थळ तसेच पश्चिमेकडील भिंतींची व्हिडिओग्राफी झाली. मुस्लीम पक्षाने चौथे कुलूप उघडले. घुमटापर्यंत साडेतीन फुटांच्या दरवाजातून सर्वेक्षण करण्यात आले. आज तिसऱ्या दिवशी जवळपास 2 तास काम केले.

हिंदू पक्षाचा दावा मजबूत असल्याचं सांगतात तर मुस्लीम काहीही मिळालं नसल्याचा दावा आहेत. सर्वेक्षणात सहभागी असलेल्या वकिलाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, तीन खोल्यांमध्ये साप, कलश, घंटा, स्वस्तिक, संस्कृत श्लोक आणि हंस यांच्या मूर्ती सापडल्या असून, हा त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. याशिवाय हिंदू मंदिरांचे खांब सापडले आहेत.

दुसरीकडे, मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी सर्व दावे फेटाळले आहेत. पण सत्य न्यायालयातच बाहेर येईल. न्यायालयाचे आयुक्त १७ मे उद्या सत्र न्यायालयात पाहणी अहवाल दाखल करणार आहेत. सीलबंद अहवाल कोर्टातच उघडेल, मगच स्पष्ट होईल की ज्ञानवापीचं सत्य काय? तळघरातून काय मिळाले? घुमटाच्या व्हिडीओग्राफीमध्ये काय टिपले आहे?