राँग नंबरवर बोलली आणि दिव्यांग तरुणाच्या प्रेमात पडली, आणि मग अशी घटना घडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 09:37 AM2021-07-21T09:37:47+5:302021-07-21T09:55:34+5:30

Love Marriage News: जोड्या ह्या स्वर्गात जुळतात, असे म्हटले जाते. तसेच प्रेमात सर्व काही माफ असते असेही सांगितले जाते. अशीच घटना समोर आली आहे.

हे प्रेमप्रकरण एका राँग नंबरच्या माध्यमातून सुरू झाले. त्यानंतर दोघांचेही प्रेम विवाहपर्यंत पोहोचले. झारखंडमधील रांची येथील एक तरुणी राँग नंबरवरून सुपौल येथील या दिव्यांग तरुणाच्या प्रेमात पडली.

दोघेही एका वर्षापासून अधिक वेळेपर्यंत फोनवरून बोलत होते. मात्र जेव्हा लग्नाचा विषय आला तेव्हा तरुणाने आपले असमर्थता तिला बोलून दाखवली. तसेच पुरावा म्हणून स्वत:चा फोटोही पाठवला. मात्र तरीही सदर तरुणी त्याच्यासोबत विवाह करण्यासाठी सुपौल येथे पोहोचली.

हा दिव्यांग तरुण दोन पायांवर उभा राहू शकत नव्हता. तरीही या तरुणीने त्याच्यासोबत विवाह केला. या विवाहामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रांची येथील गौरी नामक तरुणीने एकेदिवशी चुकून एका फोन नंबरवर मिस कॉल दिला. ते नंबर सुपौल येथील बसबिट्टी गावात राहणाऱ्या मुकेशला लागला. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि त्यातूनच हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

मात्र लग्नाचा विषय आल्यावर दिव्यांग असलेल्या मुकेशने लग्न करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. मात्र त्याच्या प्रेमात पडलेली तरुणी थेट सुपौल येथे आली. त्यानंतर या मुलीचे वडील आणि भाऊ तिच्या मागोमाग आले.

या दोघांनीही तिला लग्न न करण्याबाबत खूप समजावले. मात्र तिने ऐकून घेतले नाही. अखेर या दोघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे या तरुणीने स्पष्ट शब्दात आपण सज्ञान असून, आपल्याल मुकेशसोबत राहायचे आहे, असे सांगितले.

दोघांनीही कोर्टात जाऊन लग्न केले आणि आपले प्रेम यशस्वी केले. बसबिट्टी गावात राहणार मुकेश हा दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. तो लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते. तर त्याचे वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सोमवारी मुकेश त्याच्या मावशीसोबत सुपौल कोर्टात पोहोचला आणि त्याने या तरुणीसोबत विवाह केला.

यावेळी विवाह नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शपथपत्राद्वारे या दोघांच्याही विवाहावर शिक्कामोर्तब केले. सरकारी अधिकाऱ्यांनी या तरुणीच्या हिमतीला दाद देत ही बाब समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. दिव्यांग प्रियकराचा स्वीकार करणे ही मोठ्या हिमतीची बाब आहे. आता सरकारने या जोडीला आर्थिक मदत करावी, अशी विनंती केली. तसेच त्यांचे मनोधैर्य पाहून नोंदणीचे कुठलेही शुल्क घेतले नाही.