School Holiday: तामिळनाडूत शाळा बंद, जम्मू काश्मीरसह MP, UP मध्येही शाळांना दिर्घ काळ सुट्टी घोषित, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:43 IST2025-12-03T12:37:09+5:302025-12-03T12:43:04+5:30

भारताच्या दक्षिण पूर्व किनारपट्टीवर दितवाह चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये वेगवान वारे आणि मुसळधार पावसामुळे शाळा, कॉलेज, अंगणवाडी आणि इतर शैक्षणिक संस्था बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय देशातील इतर राज्यातही विविध कारणांमुळे डिसेंबरमध्ये शाळा कॉलेज बंद राहणार आहेत.

दितवाह चक्रीवादळ १ डिसेंबरला तामिळनाडू किनारपट्टीवर धडकले. सध्या हे वादळ बंगालच्या खाडीवरील दक्षिण पश्चिमेच्या दिशेने वाहत आहे. येणाऱ्या काळात उत्तर पश्चिमेच्या दिशेने हे वादळ सरकणार असून त्यातून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता विविध भागातील लोकांना घर खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या लोकांना चेन्नई, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे.

कन्याकुमारीत कोट्टार पेरलाया फेस्टिवलसाठी जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या फेस्टिवलसाठी तामिळनाडू, केरळसह इतर दक्षिण भारतातील राज्यातून भक्त येतात. सुट्टीमुळे अभ्यासात तूट भरून काढण्यासाठी शाळा शनिवारी ६ डिसेंबर रोजीही सुरू राहतील असं प्रशासनाने सांगितले आहे.

केरळमध्ये स्थानिक निवडणुकांमुळे ९ डिसेंबर आणि ११ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याशिवाय राज्यातील सर्व खासगी आस्थापना, शैक्षणिक संस्थांनाही ही सुट्टी जाहीर केली आहे.

उत्तर प्रदेशातील सर्व शाळांच्या दीर्घ काळ सुट्टी सुरू होणार आहेत. उत्तर प्रदेशातील शाळांना २० डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत हिवाळी सुट्टी आहे. या वर्षाच्या अखेरीस शाळा १० ते १२ दिवस बंद राहणार आहेत. त्या थेट नवीन वर्षी उघडतील.

मध्य प्रदेशातील शाळांमधील सुट्ट्यांचे वेळापत्रक तयार झाले आहे. त्याठिकाणी सरकारी आणि खासगी शाळांना २३ डिसेंबरपासून सुट्टी सुरू आहे. २३ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ पर्यंत १० दिवस मुलांना सुट्टी मिळणार आहे.

जम्मू काश्मीरात थंडीने लोकांच्या अडचणीत भर टाकली आहे. याठिकाणी विक्रमी थंडीमुळे राज्यातील शिक्षण विभागाने सर्व शाळांना दीर्घकाळ सुट्टी जाहीर केली आहे. पूर्व प्राथमिक ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ३ महिने सुट्टी दिली आहे.

दुसरीकडे ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना ११ डिसेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शाळा बंद राहणार आहेत. यंदा जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.