Ratan Tata as President of India: रतन टाटा यांना पुढील राष्ट्रपती बनवण्याची मागणी; जाणून घ्या केव्हा संपतोय रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 01:21 PM2021-08-11T13:21:44+5:302021-08-11T13:24:59+5:30

Ratan Tata as President of India: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ जुलै २०२२मध्ये संपत आहे. त्यामुळे आतापासूनच पुढील राष्ट्रपती कोण यावर चर्चा सुरू झाली आहे. अशात रतन टाटा ( Ratan Tata) यांचे नाव पुढे आले आहे. रतन टाटा हे सामाजिक कार्यात नेहमी पुढे राहिले आहेत. कोरोना काळातही त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता.

सोशल मीडियावर #RatanTata4President अशी मोहिम सुरू झाली असून टाटा यांना राष्ट्रपती बनवले जावे अशी मागणी जोर धरत आहे. तामिळ चित्रपटसृष्टीतील निर्माता नागा बाबू यांनीही रतन टाटा यांना राष्ट्रपती बनवण्याच्या चर्चांना समर्थन दिले आहे.

देशाच्या पुढील राष्ट्रपतीसाठी विरोधी पक्ष तयारीला लागले आहेत. भारतीय संविधानानुसार सलग दोनवेळा राष्ट्रपती पदावर कायम राहण्याचा नियम नाही. पण, पाच वर्षांनंतर नवीन राष्ट्रपती निवडण्याची परंपरा सुरू झाली आहे.

डॉ. राजेंद्र प्रसाद हे देशाचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांनी सलग दोन वेळा या पदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर सलग दोन वेळा या पदावर कोणालाच कायम राहता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांवरील नेत्यांना पद देण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती पदावर कायम राहण्याची शक्यता कमी आहे. रामनाथ कोविंद १ ऑक्टोबरला ७६ वर्षांचे होतील.

विरोधी पक्षाकडून शरद पवार हे मोठे नाव आहे, परंतु त्यांनी आतापर्यंत नकार दिला आहे. अशात राज्यसभा सभापती व्यंकैया नायडू यांचेही नाव चर्चेत आहे. एनडीएकडून केरळचे राज्यपाल आरिष मोहम्मद खान यांचे नाव चर्चेत आहे. नितीश कुमार यांचीही चर्चा आहे, परंतु त्यांच्याकडे उप राष्ट्रपतीची जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा आहे.

पुढील राष्ट्रपती कोण असेल, यासाठी उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल महत्त्वाची भूमिका ठरवू शकतो. सद्यस्थितीत एनडीए आघाडीवर आहे, परंतु यूपीए बरेच मागे नाहीत. निवडणुक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार खासदार व आमदार यांच्या मतांची टक्केवारी काढल्यास एनडीएकडे ४९.९ टक्के आहेत. युपीएकडे २५.३ टक्के आणि इतर पक्षांकडे २४.८ टक्के मत आहेत.

राजधानी मुंबईत राहून विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या आणि आपल्या कार्यातून आदर्शन निर्माण करणाऱ्या ३१ निवडक व्यक्तींचा मुंबई रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उद्योजक आणि टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले, पण ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.