रामजन्मभूमीच नव्हे तर या खटल्यांमधील निकालांमुळे रंजन गोगोईंची कारकीर्द ठरली संस्मरणीय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 03:47 PM2019-11-18T15:47:51+5:302019-11-18T16:06:11+5:30

रामजन्मभूमीसारख्या अत्यंत संवेदनशील प्रकरणांचा निकाल देणारे सरन्यायाधीश रंजन गोगोई नुकतेच निवृत्त झाले. केवळ रामजन्मभूमीच नव्हे तर इतर अनेक खटल्यांमध्ये दिलेल्या निकालांमुळे रंजन गोगोईंची कारकीर्द संस्मरणीय ठरली. त्यांनी दिलेल्या काही महत्त्वपूर्ण खटल्यांमधील निकालांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

गेली अनेक दशके न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असलेल्या आणि गेली तीन दशके देशाच्या राजकीय पटलावर संवेदनशील ठरलेल्या रामजन्मभूमी खटल्याचा निकाल हा रंजन गोगोई यांच्या कारकीर्दीमधील सर्वात मोठा निकाल होता. या प्रकरणी ९ नोव्हेंबर रोजी निकाल देताना गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने रामजन्मभूमी रामलल्लाला देण्याचे आदेश दिले.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचे कार्यालयही माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय गोगोई यांनी १३ नोव्हेंबर २०१९ रोजी सुनावला.

आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एनआरसी) वरून देशभरात विवाद निर्माण झाला होता. मात्र रंजन गोगोई यांनी कुठल्याही विवादामुळे विचलित न होता निर्णय दिला.

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहताना रंजन गोगोई यांनी २०१६ मध्ये अमिताभ बच्चन यांचे उत्पन्न आणि टॅक्स रिटर्नबाबत निर्णय दिला.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राफेल विमान करारप्रकरणी रंजन गोगोई यांनी १४ नोव्हेंबर २०१९ रोजी निकाल दिला. तसेच या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या.

माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज झाल्याने रंजन गोगोई यांनी जानेवारी २०१८ मध्ये अन्य तीन न्यायमूर्तींसह पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमुळे मोठी खळबळ उडाली होती.