Raja Raghuvanshi : ९ महिन्यांनी परतला 'राजा', रघुवंशी कुटुंबात आनंद; कामाख्या मंदिराच्या पुजाऱ्याची भविष्यवाणी ठरली खरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 17:12 IST2026-03-30T16:59:18+5:302026-03-30T17:12:05+5:30

Raja Raghuvanshi : इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. काही काळापूर्वी ज्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला होता, तिथे आता संपूर्ण कुटुंब आनंद साजरा करत आहे.

इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. काही काळापूर्वी ज्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला होता, तिथे आता संपूर्ण कुटुंब आनंद साजरा करत आहे.

साधारण ८-९ महिन्यांनंतर रघुवंशी कुटुंब दु:खातून सावरताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे राजा रघुवंशीचा मोठा भाऊ सचिन रघुवंशीच्या घरी एका बाळाचा जन्म झाला आहे. कुटुंबाने या बाळाचं नाव 'राजा' असंच ठेवलं आहे.

बाळाच्या जन्मानंतर राजा रघुवंशीचे कुटुंब अत्यंत आनंदी आहे. कुटुंबातील सदस्य भावूक होऊन सांगत आहेत की, "आमचा राजा पुन्हा एकदा परत आला आहे."

राजाचा भाऊ विपिनने सांगितलं की, राजाच्या हत्येनंतर तेराव्याच्या दिवशी कामाख्या मंदिराच्या पुजाऱ्याने भविष्यवाणी केली होती की, राजा याच कुटुंबात पुन्हा जन्म घेईल. अखेर पुजाऱ्याची ती भविष्यवाणी खरी ठरली आहे.

विपिन रघुवंशी पुढे म्हणाला की, "पुजाऱ्याने सांगितलं होतं की राजाचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर त्याची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राजाचं याच कुटुंबात परतणं निश्चित आहे." रघुवंशी कुटुंब आता या बाळाच्या जन्माला पुजाऱ्याच्या भविष्यवाणीशी जोडू पाहत आहे.

कुटुंबाचे म्हणणं आहे की, ज्या दिवशी राजा रघुवंशीची हत्या झाली होती, ती दुपारची २ वाजून ४० मिनिटांची वेळ होती. योगायोगाने, या बाळाचा जन्मही दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी झाला आहे. या योगायोगामुळेच राजा पुन्हा घरी परतला आहे, असं कुटुंब म्हणत आहे.

राजाच्या आईने भावना व्यक्त करताना सांगितलं की, "ज्या दिवशी माझा मुलगा गेला होता, त्याच दिवशी आणि जवळपास त्याच वेळी तो परत आला आहे. ही सर्व देवाची कृपा आहे."

कुटुंबातील सदस्यांचं असंही म्हणणं आहे की, जेव्हा बाळाला 'राजा' म्हणून हाक मारली जाते, तेव्हा तो सर्वांना ओळखत असल्यासारखं वाटतं. राजाच्या हत्येनंतर संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता, मात्र आता या बाळाच्या जन्माने घरात आनंदाचे वातावरण आहे.

राजा रघुवंशी कुटुंबाने या प्रकरणी न्यायालयाला विनंती केली आहे की, या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लावून सर्व आरोपींना कठोर शिक्षा द्यावी.

राजा रघुवंशी याचं ११ मे २०२५ रोजी लग्न झालं होतं. लग्नानंतर राजा आपल्या पत्नीसोबत (सोनम रघुवंशी) २० मे रोजी हनिमूनसाठी मेघालयाला गेला होता. तिथे २४ मे रोजी राजा बेपत्ता असल्याची बातमी समोर आली. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीत सापडला.

पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झाला की, राजाची पत्नी सोनम रघुवंशी हीच या हत्येची मुख्य सूत्रधार होती. पोलिसांनी सोनमसह इतर आरोपींना अटक केली असून, सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी जेलमध्ये आहेत.