पंतप्रधान मोदींची बचत, गुंतवणूक किती? कुठे कुठे आहे संपत्ती?; जाणून घ्या सर्व माहिती

By कुणाल गवाणकर | Published: October 15, 2020 12:25 PM2020-10-15T12:25:45+5:302020-10-15T12:32:01+5:30

शेअर बाजार, म्युचअल फंड्सच्या कितीही जाहिराती दाखवल्या जात असल्या तरीही आज बहुसंख्य भारतीय त्यांची बचत बँकांमध्येच ठेवतात. बँकेतील ठेव म्हणजे सुरक्षित ठेव अशी आजही कोट्यवधी भारतीयांची भावना आहे.

देशातील कोट्यवधी भारतीयांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची बचत बँकांमध्ये ठेवली आहे. त्यांनी बचतीचा बराचसा हिस्सा बचत खात्यांमध्ये आणि मुदत ठेवींच्या रुपात ठेवला आहे.

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संपत्तीचा तपशील जाहीर केला. ३० जूनपर्यंत पंतप्रधान मोदींकडे असलेल्या संपत्तीचं मूल्य १ कोटी ७५ लाख ६३ हजार ६१८ रुपये इतकं होतं.

३० जूनपर्यंत मोदींकडे ३१ हजार ४५० रुपयांची रोकड होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांच्याकडे असलेली जंगम मालमत्ता २६.२६ टक्क्यांनी वाढली. वेतनात झालेली बचत आणि मुदत ठेवींवरील व्याजामुळे त्यांची संपत्ती वाढली आहे.

मोदींच्या बचत खात्यात ३० जूनला ३.३८ लाख इतकी रक्कम होती. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेत मोदींचं बँक खातं आहे. तिथे ही रक्कम मोदींनी जमा केली आहे.

कर सवलत देणाऱ्या काही योजनांमध्ये मोदींनी गुंतवणूक केली आहे. जीवन विमा, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्डमध्ये मोदींची गुंतवणूक आहे.

मोदींनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात ८ लाख ४३ लाख १२४ रुपयांची गुंतवणूक केली आहे. मोदींचा विम्याचा प्रीमियम १ लाख ५० हजार ९५७ रुपये इतका आहे.

जानेवारी २०१२ मध्ये मोदींनी २० हजार रुपयांचे इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड खरेदी केले. ते अद्याप मॅच्युर झालेले नाहीत.

मोदींच्या स्थावर मालमत्तेत फारसा बदल झालेला नाही. मोदींच्या नावावर गांधीनगरमध्ये एक घर आहे. त्याची किंमत १.१ कोटी रुपये इतकी आहे.

गांधीनगरमधील घराची मालकी मोदी आणि त्यांच्या कुटुंबाकडे आहे. मोदींवर कोणतंही कर्ज नाही.

मोदींकडे स्वत:च्या मालकीचं वाहन नाही. त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत.