PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:52 IST2025-07-25T12:41:15+5:302025-07-25T12:52:10+5:30

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, एवढा प्रदीर्घ काळ पंतप्रधान पदावर राहिलेले ते बिगर हिंदी भाषी राज्यातून येणारे पहिले पंतप्रधान आहेत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. आजपासून अर्थात २५ जून २०२५ पासून ते सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मागे टाकले.

पहिल्या क्रमांकावर माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. इंदिरा गांधींचा विचार करता, त्यांचा कार्यकाळ २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ पर्यंत होता. त्यांचा एकूण कार्यकाळ ४०७७ दिवसांचा होता. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यकाळ ४०७८ दिवसांचा झाला आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे, नरेंद्र मोदी हे गेल्या २४ वर्षांपासून सत्तेत आहेत. ते प्रथम गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि नंतर सुमारे ११ वर्षांपासून देशाचे पंतप्रधान आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ते देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिलेच असे व्यक्ती आहेत, जे पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसले आहेत. अशाच काही इतरही गोष्टी आहेत...

पंतप्रधान मोदी, हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहिलेले पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी हा विक्रम माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर होता.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, एवढा प्रदीर्घ काळ पंतप्रधान पदावर राहिलेले ते बिगर हिंदी भाषी राज्यातून येणारे पहिले पंतप्रधान आहेत.

- सलग दोन कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत.

एक विक्रम असाही आहे की, स्वतःच्या बळावर बहुमत मिळवून सलग दोन वेळा सरकार स्थापन करमारे, ते पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत.

इंदिरा गांधींच्या कार्यकाळानंतर, सलग दुसऱ्यांना बहुमताने सरकार स्थापन करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. मोदी, हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून नेतृत्व करत आहेत.

मोदी हे देशातील असे पहिले नेते आहेत ज्यांनी सलग ६ निवडणुका जिंकल्या आहेत. २००२, २००७ आणि २०१२ मध्ये त्यांनी गुजरात निवडणूक जिंकली. याशिवाय २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली.