विरोधकांची 'मोदी' तयारी! लोकसभेच्या 450 जागांवर भाजपाविरोधात एकच उमेदवार असणार, काँग्रेस राजी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 01:51 PM2023-05-30T13:51:30+5:302023-05-30T14:08:29+5:30

Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी 543 पैकी विरोधी पक्ष अनेक जागांवर एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता नाही तर कधीच नाही, अशा पवित्र्यात विरोधी पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ थोपविण्यासाठी तयारीला लागले आहे. बिहारमधून याचे नेतृत्व केले जात आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान व्हायची सुप्त इच्छा आहे. यामुळे मोदीविरोधी पक्षांची मोट कशी बांधणार याचे आव्हान या महाआघाडीसमोर असणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी 543 पैकी विरोधी पक्ष अनेक जागांवर एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी हे प्रादेशिक पक्ष एकत्र येत आहेत. याद्वारे जवळपास ४५० जागांवर भाजपविरोधात एकच उमेदवार दिला जाणार आहे. परंतू, यामध्ये काँग्रेस खेळ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

विरोधी पक्ष काँग्रेसला मनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने जर ते जिंकतील अशा जागावरच उमेदवारी सांगितली तर हे शक्य होणार आहे. परंतू, काँग्रेसने जर सर्व जागांवर उमेदवार दिले तर मोदी विरोधी मोट बांधलेल्यांना पराभवाला सामोरे जावे लागणार आहे.

भाजपविरोधी मतांचे विभाजन झाल्याने काँग्रेस आणि विरोधी पक्ष पराभूत होण्याची शक्यता आहे. यासाठी अखिलेश यादव, ममता बॅनर्जी देखील काँग्रेसने विजयाची खात्री किंवा ताकद असलेल्या जागांवर उमेदवार देण्याची मागणी करत आहेत.

सर्व जागांवर उमेदवार उभे करून भाजपाने वातावरण खराब करू नये, असे या पक्षांना वाटत आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना जरी हे लक्षात आले तरी स्थानिक नेत्यांना यावर राजी करण्याची गरज पडू शकते. २०२४ च्या निवडणुकीत सर्वसंमतीने एकच उमेदवार देण्याचा प्रस्ताव पाटन्यामध्ये १२ जूनला होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत नितीश कुमार यांनी ठेवला आहे.

नितीश कुमार यांनी २२ मे रोजी या साऱ्या प्रश्नांवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावेळी नितीश कुमार यांनी विरोधकांचा एकच उमेदवार रिंगणात उतरवावा, या रणनितीवर जोर दिला आहे.

दुसरीकडे कर्नाटकातील विजयावर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या होत्या. संयुक्त विरोधी पक्षाच्या उमेदवारीची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. परंतू, २०१९ च्या निवडणुकीत हीच गोष्ट ममता यांना रुचली नव्हती. परंतू, यावेळी अनेक प्रादेशिक पक्षांची तत्वता संमती आहे. या पक्षांची ताकद बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये आहे.

ही राज्ये मोठ्या संख्येने लोकसभेत खासदार पाठवितात. परंतू, विरोधीपक्षांसमोर जागा वाटरपाचा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असणार आहे. यावर सर्व पक्ष सहमत व्हायला हवेत, तरच मोदींविरोधात पूर्ण ताकदीने लढता येईल असे या आघाडीला वाटत आहे.

बंगालमध्ये ममता यांचा गढ असलेला मुर्शिदाबादमधून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या उमेदवारीवरून पेच निर्माण होऊ शकतो. अखिलेश यांना देखील काँग्रेस पक्ष मते वाया घालविणार असे वाटत आहे. यामुळे त्यांनी युपीमध्ये जास्त जागा लढवू नयेत, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतू काँग्रेस हे मान्य करेल असे वाटत नाहीय.

मुंबईत काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनीच आम्ही कमीतकमी ४५० जागांवर एकच संयुक्त विरोधी उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे म्हटले आहे. परंतू काँग्रेसला त्या त्या राज्यातील नेते अडचणीत आणू शकतात. पंजाब आणि दिल्लीत आपसोबत जाण्यास काँग्रेसी नेत्यांचा विरोध आहे. असाच विरोध पश्चिम बंगाल, दक्षिण भारतात होण्याची शक्यता आहे.