ऑपरेशन सिंदूर: ज्या डमी विमानांना पाकिस्तान भुलला, ते विमान कोणते? एअर डिफेंस सिस्टीम राफेल समजून बसली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 10:06 IST2025-05-23T09:51:39+5:302025-05-23T10:06:34+5:30
Operation Sindoor, India vs Pakistan: पाकिस्तानची नांगी ठेचणारे विमान हे लढाऊ नव्हते, पण लढाऊ विमानांची, मिसाईलची ट्रायल घेणारे हे मानवरहित विमान होते.

पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम कुठे तैनात आहे, याचा अंदाज घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने डमी विमाने पाकिस्तानात घुसविली होती. भारतीय हवाई दलाने याची माहिती देताना आपले पायलट सुखरूप आहेत असे सांगितले होते. पाकिस्तानी तर राफेल पाडले, राफेल पाडले म्हणून नाचत होते. पण त्यांचीच नाचानाची झाली होती. या डमी विमानाचे व्हिडीओ, फोटो समोर येत आहेत.
पाकिस्तानची नांगी ठेचणारे विमान हे लढाऊ नव्हते, पण लढाऊ विमानांची, मिसाईलची ट्रायल घेणारे हे मानवरहित विमान होते. भारतीय सैन्याच्या दक्षिण पश्चिमी कमांडने या विमानाचा व्हिडीओ जारी केला आहे.
हे विमान बॅनशी-८०+ आहे. ते जगभरातील सर्वच हवाई दलांकडून वापरले जाते. जवळपास ४५ मिनिटे हे विमान हवेत उडू शकते. यामध्ये इतर विमानांसारखेच इंजिनही असते. विंगही असतात आणि ट्रॅक करण्यासाठी ड्रोनसारखीच यंत्रणाही असते.
एकप्रकारे ड्रोनसारखेच असलेले हे डमी विमान सुखोई, मिग किंवा राफेलसारखे भासते. किनेटीक या कंपनीने हे विमान लष्करी सरावासाठी बनविले आहे. नुकतीच या कंपनीने १० हजारवे युनिट विकले आहे. म्हणजे या विमानाचा किती मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो हे लक्षात येईल.
बॅनशी-८०+ चा ताशी वेग हा ७२० किमी प्रति तास एवढा प्रचंड आहे. या विमानाचे डिझाईन भारताने सुखोई, मिग किंवा राफेलसारखे करून घेतलेले आहे. यामुळे रडारला ते त्याप्रमाणेच भासते. पाकिस्तानी रडारने हीच चूक केली आणि त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम सुरु केली.
पाकिस्तानी रडारनी तरंग सोडले, ते बॅनशी-८०+ वर आदळले आणि त्यांना भारताची राफेलच आली असे वाटले. वटवाघळासारखी ही सिस्टीम काम करत असते. ते तरंग पुन्हा पाकिस्तानी रडारकडे गेले आणि त्यांनी राफेल असल्याचे संकेत दिले. पाकिस्तानला वाटले, काही क्षणांत आपण राफेल पाडू. कारण चीनची एअर डिफेन्स सिस्टीम राफेलला रोखणार असल्याचा विश्वास त्यांना होता.
एअर डिफेन्स सिस्टीम अॅक्टीव्हेट करण्यात आली. पाकिस्तानने ती या विमानांवर डागण्यास सुरुवात केली. तोवर पाकिस्तानात राफेल पाडल्याच्या अफवांचा मोहोळ उठला.
सोशल मीडियावर दावे केले जाऊ लागले. पण या काळात चीनची एअर डिफेन्स सिस्टीम पार गोंधळून गेली होती. आकाश आणि ब्रम्होस मिसाईलनी तोवर पाकिस्तानी एअरफोर्सचा कार्य्रकम उरकून टाकला होता.
भारताने पाकिस्तानचाच नाही तर चीनच्या एअर डिफेन्स सिस्टीमला चकमा देत चिनी सैन्याचीही मोठी पोलखोल केली. चिनी एअर डिफेन्स सिस्टीम किती तकलादू आणि बेभरवशी असल्याचे भारतीय सैन्याच्या क्लुप्त्यांनी सिद्ध करून दाखविले.