गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:34 IST2025-05-16T11:27:15+5:302025-05-16T11:34:02+5:30
Operation Sindoor : पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसले खरे परंतू हवेतच नष्ट झाले. निशस्त्र ड्रोन असल्याचे समजताच युद्धतज्ञांनी पाकिस्तानच्या या खेळीमागील त्यांचे इप्सित जगजाहीरही केले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम कुठे कुठे आहेत, हे पाकिस्तानला जाणून घ्यायचे होते.

युद्ध शक्तीने नाही तर युक्तीने लढले जाते, जिंकले जाते असे म्हणतात. पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करताना शेकडो ड्रोन पाठविले खरे परंतू त्यावर शस्त्र लादलेले नव्हते. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम कुठे कुठे आहे हे त्या पाकिस्तानला जाणून घ्यायचे होते. परंतू, असे करताना पाकिस्तान विसरला की भारतही आपल्यासोबत हाच गेम खेळेल.
भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकिस्तानच्या शेकडो ड्रोन्सचा चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसले खरे परंतू हवेतच नष्ट झाले. निशस्त्र ड्रोन असल्याचे समजताच युद्धतज्ञांनी पाकिस्तानच्या या खेळीमागील त्यांचे इप्सित जगजाहीरही केले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम कुठे कुठे आहेत, हे पाकिस्तानला जाणून घ्यायचे होते.
ड्रोन हल्ला होतोय हे पाहून भारताने एअर डिफेन्स सिस्टीम अॅक्टीव्हेट केल्या, परंतू त्या एवढ्या तगड्या होत्या की ड्रोन सोडा पाकिस्तानी मिसाईल, लढाऊ विमानही हवेतच उडवून देण्यात आली. पाकिस्तान भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमचा केसही वाकडा करू शकला नाही.
पण, भारताने पाकिस्तानची चीनकडून कर्जावर घेतलेली महागडी एअर डिफेन्स सिस्टीम लिलया उध्वस्त केली आणि मग ब्राम्होस मिसाईलनी पाकिस्तानात हल्ला करत हाहाकार उडवून दिला.
पाकिस्तानकडे एअर डिफेन्स सिस्टीम आहे, परंतू ती कुठे तैनात आहे याचा शोध भारतीय सैन्याला घ्यायचा होता. तिचा ठावठिकाणा लावण्यासाठी भारतीय हवाई दलाने प्लॅन आखला.
पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात डमी लढाऊ विमाने घुसविली. खऱ्या लढाऊ विमानांप्रमाणे भासल्याने पाकिस्तानने लगेचच एअर डिफेन्स सिस्टीम अॅक्टीव्हेट केली आणि गेम इथेच फिरला. भारताला पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमचे लोकेशन सापडले. पुढचा कार्यक्रम ब्राम्होस मिसाईलनी उरकून टाकला.
भारताने डमी जेट् पाठविले, परंतू पाकिस्तानी रडारला ते फाय़टर जेटसारखे दिसत होते. यामुळे पाकिस्तानने त्यांचा रडार आणि एअर डिफेन्स सिस्टीम अॅक्टीव्हेट केली. यानंतर भारताने पाकिस्तानी एअरबेसवर ब्राम्होस मिसाईलचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली.
जवळपास २३ मिनिटे भारताने डमी जेट्सच्या मदतीने पाकिस्तानची डिफेन्स सिस्टीम जाम केली होती. या काळात भारताची १५ ब्राम्होस मिसाईल पाकिस्तावर आदळली. १३ पैकी ११ एअरबेसवर हल्ला करून भारताने पाकिस्तानी हवाई दलाचे कंबरडेच मोडले. आणि म्हणून पाकिस्तान भारताला सीझफायर करण्याची विनवणी करू लागला. गेम इथेच फिरला होता...