CoronaVirus News: ओमायक्रॉनचा मुक्काम १४ महिन्यांपासून भारतात? तज्ज्ञांनी दूर केलं कोट्यवधी भारतीयांचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 12:00 PM2021-12-04T12:00:31+5:302021-12-04T12:03:30+5:30

CoronaVirus News: चिंता करू नका, घाबरू नका, पण काळजी घ्या; तज्ज्ञांचं आवाहन

देशावरील कोरोनाचं संकट दूर झालं असं वाटत असतानाच ओमायक्रॉननं चिंता वाढवली. आफ्रिकेत सर्वप्रथम आढळून आलेल्या ओमायक्रॉननं आतापर्यंत तीन डझनहून अधिक देशांमध्ये शिरकाव केला आहे. यामध्ये भारताचादेखील समावेश आहे.

गुरुवारी (२ डिसेंबरला) कर्नाटकमध्ये ओमायक्रॉननं दोन रुग्ण आढळून आले. मात्र ओमायक्रॉन व्हेरिएट त्यापेक्षा बराच आधीपासून देशात होता, असं तज्ज्ञांना वाटतं. कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीपासून देशात पसरत होता, असं साथरोगत्ज्ञांना वाटतं.

दक्षिण आफ्रिकेत आढळून येण्यापूर्वी, बऱ्याच आधीपासून, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासूनच ओमायक्रॉन भारतात असल्याची शक्यता एका तज्ज्ञानं वर्तवली. ओमायक्रॉन आधीपासूनच भारतात आहे. मात्र तो आढळून आला नाही.

परदेश प्रवासाची पार्श्वभूमी नसलेल्या एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. यामधून ओमायक्रॉन व्हेरिएंट भारतात आधीपासूनच होता, या शंकेला बळ मिळतं. बंगळुरूतील एका ४६ वर्षीय डॉक्टरांना ओमायक्रॉनची लागण झाली. ते डॉक्टर देशाबाहेर गेले नव्हते.

ओमायक्रॉन दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. मात्र हा नवा स्ट्रेन भारतातही पसरत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवेळी लोकसंख्येचा एक लहानसा हिस्सा ओमायक्रॉन स्ट्रेनमुळे संक्रमित झाला असावा, असं देशातील महामारीतज्ज्ञ डॉ. जेकब जॉन यांनी सांगितलं.

ओमायक्रॉन व्हेरिएंटची आतापर्यंत समोर आलेली लक्षणं हलक्या स्वरुपाची असल्याची माहिती डॉ. जॉन यांनी दिली. लोकांनी घाबरून जाऊ नये. पण बेजबाबदारपणे वागू नये. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिनचे माजी संचालक डॉ. देबप्रसाद चटोपाध्याय यांनीदेखील काहीशी अशीच शक्यता वर्तवली. नवा व्हेरिएंट भारतात आधीपासूनच पसरला असावा ही शक्यता नाकारता येत नाही, असं ते म्हणाले.

परदेशातून न आलेल्या डॉक्टरांना ओमायक्रॉनची लागण झाली. यातून ओमायक्रॉनचा फैलाव देशात आधीपासूनच झाल्याचं समजतं. ओमायक्रॉन असो वा दुसरा एखादा स्ट्रेन, त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण बहुतांश लोकसंख्या आधीच संक्रमित होऊन गेली आहे, असं चटोपाध्याय यांनी सांगितलं.

ओमायक्रॉनची ओळख परदेशात पटली, याचा अर्थ त्याचा फैलाव भारतात होत नव्हता असा नाही. मात्र याचा वापर भीती निर्माण करण्यासाठी होऊ नये. लोकांनी चिंता करू नये. मात्र काळजी घ्यावी, असं कोरोना विषाणूचे तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कैक्किलया यांनी सांगितलं.