Nipah Virus: धोक्याची घंटा! 'कोरोना'वर लस आली, पण 'निपाह'वर नाही; ६५ टक्के मृत्यूचं प्रमाण, काय आहेत लक्षणं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 12:43 PM2021-09-05T12:43:47+5:302021-09-05T12:49:49+5:30

Nipah Virus: देशात कोरोना व्हायरसचं संकट असतानाच आता निपाह विषाणूनंही एन्ट्री केली आहे. त्यामुळे देशासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. निपाह व्हायरसची नेमकी लक्षणं कोणती? जाणून घेऊयात...

देशात कोरोना रुग्णसंख्या स्थिर असली तरी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढीचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. अशातच आता केरळच्या कोझिकोडमध्ये निपाह विषाणूचीही एन्ट्री झाली आहे.

केरळच्या कोझिकोडमध्ये १२ वर्षीय मुलाचा निपाह विषाणूमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय पुणे स्थित राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या वैज्ञानिकांनीही महाराष्ट्रात पहिल्यांदाच वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये घातक निपाह विषाणू आढळून आला आहे.

मार्च २०२० मध्ये साताराच्या महाबळेश्वर येथील एका गुहेतील वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला होता. भारतात २००१ साली पहिल्यांदाच निपाह विषाणू आढळून आला होता. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे निपाह विषाणूची लागण झालेले ६६ रुग्ण आढळून आले होते. त्यात तब्बल ४५ जणांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर ६ वर्षांनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा निपाह विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले होते. बंगालच्या नदिया जिल्ह्यात पाच जणांचा निपाह विषाणूमुळे मृत्यू झाला होता.

निपाह विषाणूची लागण होताच शरीरात याची अनेक लक्षणं दिसून येतात. यात ताप, डोकेदुखी, बेशुद्धी, उलटी, चक्कर येणं, अस्वस्थ वाटणं, सुस्ती येणं, प्रकाशाचा त्रास होणं आणि शरीरातील विविध भागांमध्ये वेदना सुरू होणं अशी लक्षणं दिसून येतात.

वरील पैकी लक्षणं आढळून येत असतील तर तातडीनं चाचणी केल्यानं विषाणूवर मातही करता येते. पण दुर्लक्ष करणं थेट रुग्णाच्या जीवावर ओढावू शकतं.

निपाह विषाणूबाधित वटवाघळानं खाल्लेली फळं मनुष्यानं खाल्ली की त्यातून निपाह विषाणूचं मानवात संक्रमण होतं. त्यानंतर निपाह विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणं देखील या विषाणूच्या प्रसाराचा कारण ठरू शकतं.

तज्ज्ञांच्या मतानुसार वटवाघळांसोबतच निपाह विषाणू डुक्करांच्या संपर्कात आल्यानंही पसरण्याची शक्यता आहे. निपाह विषाणू मानवी शरीरात डोळे, नाक आणि तोंडावाटे होतं.

संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूचा सामना करत आहे. या लढाईत यशही येताना दिसत आहे. कारण कोरोना विषाणूचा अटकाव करण्यासाठी विविध लसींचीही निर्मिती झाली आहे. पण निपाह विषाणूनवर अद्याप कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे या विषाणूचं गांभीर्य आपल्याला लक्षात येऊ शकतं.