एनडीए ३०० पार, पण भाजप-काँग्रेसला किती जागा; आज लोकसभा निवडणूक झाली, तर काय असेल निकाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 09:11 IST2025-02-13T09:04:10+5:302025-02-13T09:11:16+5:30
Mood of The Nation Survey 2025: आजघडीला देशात लोकसभा निवडणूक झाली तर निकाल काय लागेल, याचा अंदाज मांडणारा एक सर्व्हे समोर आला आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि सी व्होटरच्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमधून कोणते निष्कर्ष मांडण्यात आले आहेत, जाणून घ्या.

मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये १ लाख २५ हजार १२३ लोकांचे मत जाणून घेण्यात आले. वेगवेगळ्या वयोगटातील, उत्पन्न गटातील, जातींतील आणि शहरी ग्रामीण लोकांना यात सहभागी करून घेण्यात आले होते. या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार, आजघडीला लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला २८१ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसची घसरण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसला ७८ जागा मिळू शकतात, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या होत्या. एनडीएला ३४३ जागा, तर इंडिया आघाडीला १८८ जागा मिळतील, असे या सर्व्हेचा अंदाज आहे.
आजघडीला लोकसभा निवडणूक झाल्यास पुढील पंतप्रधान म्हणून कोणत्या नेत्याला बघायला आवडेल? या प्रश्नावर ५१.२ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दिली आहे. तर २४.९ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली आहे. १.२ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावाला पसंती दिली आहे.
देशात आता लोकसभा निवडणूक झाली तर कोणाला किती मते मिळतील? याबद्दल या सर्व्हेमध्ये असा अंदाज मांडला आहे की, एनडीएला ४६.९ टक्के मते मिळतील, तर इंडिया आघाडीला ४०.६ टक्के मिळू शकतात.
काँग्रेसला कोणता नेत्या चांगल्या पद्धतीने चालवू शकतो? या प्रश्नावर सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी ३६.४ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली आहे. ११.२ टक्के लोकांनी प्रियंका गांधी आणि ८.४ टक्के लोकांनी सचिन पायलट यांच्या नावाला पसंती दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना २.७ टक्के लोकांनीच पसंती दिली आहे.
मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये आतापर्यंतचे सर्वात चांगले पंतप्रधान कोण आहेत? यात ५०.७ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना आतापर्यंतचे सर्वात चांगले पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे. ५.२ टक्के लोकांनी जवाहरलाल नेहरू यांना पसंती दिली आहे. १०.३ टक्के लोकांनी इंदिरा गांधी, १३.६ टक्के लोकांनी डॉ. मनमोहन सिंग, ११.८ टक्के लोकांनी अटल बिहारी वाजपेयी यांना चांगले पंतप्रधान म्हटले आहे.
सर्वात चांगले मुख्यमंत्री कोण? या प्रश्नावर ३५.३ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना मत दिले आहे. १०.६ टक्के लोकांनी ममता बॅनर्जींना पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर एमके स्टॅलिन (५.१ टक्के), चौथ्या क्रमांकावर चंद्राबाबू नायडू (५.१ टक्के) आणि पाचव्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस (४ टक्के) आहेत.
लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांची कामगिरी कशी आहे? यावर २४.८ टक्के लोकांनी खूप चांगली आहे, असे म्हटले आहे. तर २६.९ टक्के लोकांनी खराब कामगिरी असल्याचे मत नोंदवले आहे.
काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष वाटतो का? यावर ६४.४ टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले आहे, तर ३१ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे.
नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून कामगिरी कशी वाटते? या प्रश्नावर ३६.१ टक्के लोकांनी खूप चांगली असे म्हटले आहे. तर १२.८ टक्के लोकांनी खूप खराब असे म्हटले आहे.
जर आजघडीला लोकसभा निवडणूक झाल्यास कोणाला किती जागा मिळतील? या सर्व्हेच्या अंदाजानुसार भाजपला २८१ जागा, काँग्रेसला ७८ जागा, इतरांना १८४ जागा मिळू शकतात. जर ऑगस्ट २०२४ मध्ये निवडणूक झाली असती, तर भाजपला २४४ जागा, काँग्रेसला १०६ जागा आणि इतरांना १९३ जागा मिळाल्या असत्या. लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा, काँग्रेस ९९ जागा आणि इतरांना २०४ जागा मिळाल्या आहेत.