मुंबईतून मरीन ड्राइव्ह होणार गायब...! आपली 'ही' शहरं गिळण्यासाठी सरसावतोय समुद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 05:06 PM2022-12-01T17:06:32+5:302022-12-01T17:16:18+5:30

वर्ष 2050 पर्यंत या शहरांची स्थिती आणखीनच बिकट होईल. समुद्राच्या या वाढत्या पाणी पातळीचा मुंबईतील किमान 1000 इमारतींना फटका बसेल.

सुमुद्र दिवसेंदिवस जमिनीकडे सरकताना दिसत आहे. पुढील आठ वर्षांत अर्थात 2030 पर्यंत मुंबई, कोची, मेंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरमचा किनारी भाग संकुचित होईल. समुद्राचे पाणी जमीन गिळंकृत करेल. एवढेच नाही, तर काही लोकांना त्यांची घरे आणि काम धंदाही सोडावा लागेल आणि राहण्याची जागाही बदलावी लागणार आहे.

वर्ष 2050 पर्यंत या शहरांची स्थिती आणखीनच बिकट होईल. समुद्राच्या या वाढत्या पाणी पातळीचा मुंबईतील किमान 1000 इमारतींना फटका बसेल. किमान 25 किमी लांबीचा रस्ता उद्धवस्त होईल. एवढेच नाही, तर ज्यावेळी भरती येईल, त्यावेळी तब्बल 2490 इमारतींना याचा फटका बसेल आणि एकूण 126 किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली जाईल.

RMSI ने याच वर्षी जुलै महिन्यात एक अभ्यास केला होता. यात, हाजी अली दर्गाह, जवाहर लाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, बांद्रा-वर्ली सी लिंक, मरीन ड्राइव्हवर क्वीन नेकलेस हे सर्व बुडण्या उंबरठ्यावर पोहोचतील. RMSI ने हे विश्लेषण IPCC च्या सहाव्या क्लायमेट अॅसेसमेन्ट रिपोर्टवरून केले आहे.

ही स्थिती केवळ मुंबईवरच ओढवणार नाही, तर समुद्राच्या वाढत्या पातळीचा परिणाम कोच्चि, मेंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टनम आणि तिरुवनंतपुरम वरही होईल. IPCC ने जो इशारा दिला आहे, तो तर वेगळाच आहे.

पृथ्वी मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, 1874-2004 दरम्यान उत्तर हिंद महासागर दरवर्षी 1.06 ते 1.75 मिमी या वेगाने वाढत होता. मात्र 1993 ते 2017 या काळात हे प्रमाण प्रतिवर्ष 3.3 मिमीच्या दराने वाढत आहे. आपण 1874 ते 2005 पर्यंतचा विचार केला, तर हिंदी महासागर जवळपास एक फूट वर आला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, समुद्राची पातळी वाढण्यास जागतिक तापमानवाढ कारणीभूत आहे. जागतिक स्तरावर तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास वादळेही वाढतील. भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टीवर चक्रीवादळांची संख्या गेल्या चार वर्षांत 52 टक्क्यांनी वाढली आहे.

2050 पर्यंत या शहराचे होणार हाल बेहाल - वर्ष 2050 पर्यंत तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास चक्रीवादळांच्या संख्येत मोठी वाढ होईल. ते तीनपटही वाढू शकतात. 2050 पर्यंत चेन्नईमध्ये 5 किलोमीटर लंबीचा रस्ता, आणि 55 इमारतींना समुद्राचा फटका बसेल. कोचीमध्ये किमान 464 इमारतींना समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा फटका बसेल. तर भरतीच्या काळात जवळपास 1502 इमारतींना याचा फटका बसेल. तिरुवनंतपुरममध्ये 349 ते 387 इमारतींचे नुकसान होईल. विशाखापट्टनम मध्ये 9 किलोमीटर लांब रस्ता आणि 206 इमारतींवर याचा परिणाम होईल.

भारतातील या 12 शहरांना सर्वाधिक धोका - वर्ष 2100 पर्यंत सर्वाधिक धोका ज्या शहरांना आहे, त्यांत भावनगर - येथे समुद्राची पाणी पातळी 2.69 फूट वाढेल. कोचीमध्ये 2.32 फूटांची वाढ होईल. मोरमुगाओमध्ये 2.06 फूट, ओखा (1.96 फूट), पारादीप (1.93 फीट), मुंबई (1.90 फीट), तूतीकोरीन (1.93 फीट), चेन्नई (1.87 फीट) विशाखापट्टनम (1.77 फीट) आणि मंगळुरू (1.87 फीट) या शहरांचा समावेश आहे.

या सर्व किनारपट्टी भागांत अनेक ठिकाणी मुख्य बंदरे आहेत. व्यापारी केंद्रे आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग धंदे चालतात. समुद्रातील पाणी पातळी वाढल्यास आर्थक व्यवस्थेला मोठा फटका बसेल.