लग्नसोहळ्यात सामील झालेल्या ९५ जणांना कोरोनाची लागण, वधूच्या वडिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 09:11 PM2021-05-21T21:11:40+5:302021-05-21T21:34:43+5:30

Corona Virus : राजस्थानमधील गावात एका दिवसात 95 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गावात कोरोनाची दहशत पसरली आहे.

देशात सध्या अनेक राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे या कोरोनावर मात करण्यास अपयश आले तर त्याचे परिणाम किती भयानक होतील, याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसह देशाच्या अनेक राज्यांतून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून हे लक्षात येईल. या महामारीत देशातील मोठ्या लोकसंख्येला धोका आहे, जी गावांमध्ये राहते आणि त्याठिकाणी उपचारांची सोय नाही.

राजस्थानमधील गावात एका दिवसात 95 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गावात कोरोनाची दहशत पसरली आहे. झुंझनू जिल्ह्यातील स्यालू कला गावात तीन लग्नसोहळ्यात सामील झालेल्या 150 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये 95 लोकांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह झाली. इतकेच नाही तर लग्नाच्यावेळी वधूच्या वडिलांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

स्यालू कला गावात राहणारे सुरेंद्र शेखावत यांनी सांगितले की, कोरोनाची टेस्ट केली असता गावातील 95 जणांनी टेस्ट पॉझिटिव्ह आली. 25 एप्रिल रोजी तीन लग्ने झाली आणि यादरम्यान एक लग्नातील वधूच्या वडिलांचा मृत्यूही झाला. याआधी गावातील लोक कोरोनाबाबत जास्त सतर्क नव्हेत, ते बिनधास्त फिरायचे.

याचबरोबर, जेव्हा प्रत्येकाची टेस्ट करण्यात आली. त्यानंतर गावात भीतीचे वातावरण आहे. लोक त्यांच्या घरात बसले आहेत. इतकेच नाही तर कोरोना रुग्णांची संख्या वाढताच अधिकाऱ्यांनीही गावाकडची वाट फिरवली. तसेच, लोक आमच्या गावचे नाव ऐकल्यानंतर आपला मार्ग बदलतात, असे वीरेंद्र सिंह यांनी सांगितले.

गावांमध्ये संपूर्ण शांतता आहे, रस्ते रिकामे आहेत, मुले घरातच बंद आहेत आणि लोक कामावर जात नाहीत. राजस्थान सरकारने केवळ 11 लोकांना लग्नाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी 1 लाख रुपये दंडही आकारला आहे. असे असूनही, लोकांनी या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. याचा इतर लोकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

लग्नसोहळ्यांमध्ये जास्त गर्दी झाल्याने अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. लोकांना वाटले की, कोरोना केवळ शहरातच मर्यादित असेल. म्हणूनच प्रत्येकजण बेभान होता परंतु गावातील मृत्यूने सर्वांनाच चिंताग्रस्त केले आहे. आता लोक त्याचे गांभीर्य समजून घेत आहेत आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले.

कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे गावांतील लोकांची भीती वाढली आहे. लोक त्यांच्या मुलांना बाहेर पडू देत नाही. राजस्थानमधील बहुतांश गावांमध्ये परिस्थिती चिंताजनकआहे. प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर गावातील लोक या भयानक आजारापासून स्वत: चे रक्षण कसे करावे, याची जाणीव करून देण्यात गुंतले आहेत.