जय हो... देशात महाराष्ट्र नंबर 1, राज्यात 1.5 कोटी नागरिकांचं लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 02:17 PM2021-04-27T14:17:43+5:302021-04-27T14:26:14+5:30

महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला असून देशात सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली आहे. त्यामुळे, देशात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे

राज्यात सोमवारी सायंकाळी सहापर्यंत दिवसभरात पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

राज्यात ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.

त्यानंतर, राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आता राज्यात १.५ कोटी नागरिकांचे लसीकरण महाराष्ट्राने केले आहे.

सोमवारीच राज्याने १ कोटी ४८ लाखांच्या आसपास लसीकरणाचा आकडा गाठला होता. उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले होते.

महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला असून देशाता सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे.

गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे असून आज २६ एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ६१५५ लसीकरण केंद्र होते.

त्यामध्ये ५३४७ शासकीय आणि ८०८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीले आहे.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.