प्रयागराजसाठी हवाई प्रवास महागला; एका तिकीटाचे दर 50 हजारांवर पोहोचले, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 22:07 IST2025-01-28T22:04:51+5:302025-01-28T22:07:47+5:30
Mahakumbh 2025: 29 जानेवारीला प्रयागराजमध्ये शाही स्नानासाठी मोठ्या संख्येने लोक महाकुंभात सहभागी होणार आहे

Mahakumbh 2025: तुम्हाला महाकुंभासाठी विमानाने प्रयागराजला जायचे असेल, तर त्यासाठी आगाऊ पैसे द्यावे लागतील. प्रयागराजला जाणाऱ्या विमानांचे भाडे गगनाला भिडले आहेत. विमान कंपन्या सामान्य भाड्यापेक्षा 4 ते 5 पट जास्त भाडे आकारत आहेत.
हा केवळ महाकुंभाचा विषय नाही, तर भारतातील प्रत्येक सणाला भाडेवाढ केली जाते. अशा परिस्थितीत एवढे महागडे भाडे का आकारले जाते आणि विमान कंपन्यांकडून भाडे वाढवण्याचे सूत्र काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
विमान भाड्याची चर्चा जोर धरू लागली आहे, याचे कारण म्हणजे उद्या, 29 जानेवारीला प्रयागराजच्या शाही स्नानासाठी मोठ्या संख्येने लोक महाकुंभात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने विमान कंपन्यांनी विमान भाडे वाढवले आहे.
दिल्ली-प्रयागराज विमान भाडे चार पटीने वाढून 50,000 रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. अनेक लोक त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मौनी अमावस्येमुळे 28 आणि 29 जानेवारीला प्रयागराजमध्ये जास्तीत जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेच्या मते, 28 जानेवारीसाठी मुंबई-प्रयागराज रिटर्न तिकिटाची सर्वात स्वस्त किंमत 41,000 रुपयांपेक्षा जास्त आहे.
DGCA ने निर्देश जारी केले- विमान कंपन्यांवर लक्ष ठेवणाऱ्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) आता हवाई भाडेवाढीबाबत हस्तक्षेप केला आहे. DGCA ने विमान कंपन्यांना प्रयागराजसाठी विमान भाडे तर्कसंगत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भारतात विमान भाडे कसे ठरवले जाते? केवळ कुंभ काळातच नाही, तर होळी आणि दिवाळी यांसारख्या सणांमध्येही हवाई भाड्यात अशीच वाढ झालेली दिसते. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या सुट्टीच्या काळातही असेच घडते. भाडे ठरवण्याचे कोणतेही सूत्र नाही. कंपन्या जास्त शुल्क आकारून नफा मिळवत आहेत.
सोशल मीडियावर अनेकजण तिकीटाचे दर शेअर करत आहेत. एका व्यक्तीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, दिल्ली ते सिंगापूर भाडे 12 हजार ते 17 हजार रुपये आहे. पण दिल्ली ते प्रयागराज परतीचे भाडे 50 हजार रुपयांपर्यंत वाढले आहे.