झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 08:50 PM2020-08-06T20:50:46+5:302020-08-06T21:08:13+5:30

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा हा हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. येथील लोकांचं नशीब कधी चमकेल हे कुणीच सांगू शकत नाही. या जिल्ह्यातल्या मातीचं खास वैशिष्ट्य आहे. ही माती केव्हाही दरिद्री मनुष्याला थेट राजा बनवू शकते. एकीकडे देशात करोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. तर दुसरीकडे पन्नातील माती मजुरांना मुल्यवान रत्नांचा उपहार देत आहे.

यामुळेच पन्नातील तरुणांसह गरीब मजूरही हिऱ्यांच्या खाणीत काम करण्यासाठी उत्सूक दिसत आहेत.

पन्नातील जरुआपूर उथली येथील खाणीत गुरुवारी एका मजुराला एकाच वेळी चक्क तीन हिरे सापडले. या युवकाचे नाव सुबल असे आहे. त्याला हे हिरे खाणीतील माती पाण्याने स्वच्छ करताना सापडले. त्याला सापडलेल्या या हिऱ्यांचे वजन जवळपास साडे सात कॅरेट एवढे आहे.

या तीनही हिऱ्यांचे वजन प्रत्येकी, 4.45, 2.16 आणि 0.93 कॅरेट एवढे आहे. तसेच यांचे एकून वजन 7.52 कॅरेट एवढे आहे.

साधारणपणे एका कॅरेटच्या हिऱ्याची किंमत 5 लाख रुपये एवढी असते. अशा प्रकारे या हिऱ्यांची किंमत 30 ते 35 लाख रुपयांदरम्यान असल्याचा अंदाज लावला जात आहे.

संबंधित मजुराने हे हिरे आपल्या सहकाऱ्यांसह हिरा कार्यालयात जाऊन जमा केले आहेत. आता लिलावानंतर मजुराला या हिऱ्यांची किंमत मिळेल.

या हिऱ्यांची बोली आगामी लिलावात लागेल. यानंतर या हिऱ्यांची जी किंमत येईल त्यातील 12 टक्के रक्कम सर्व प्रकारच्या टॅक्सच्या स्वरुपात कापली जाईल.

सर्व प्रकारचे टॅक्स कापल्यानंतर उरलेली 88 टक्के रक्कम हिरा अधिकारी संबंधित मजुराला देतील. यानंतर तो मजूर एकदमच लखपती होईल.

काही दिवसांपूर्वी एक मजुराला 10.69 कॅरेटचा मौल्यवान हीरा सापडला होता. या हिऱ्याची किंमत साधारणपणे 50 लाख रुपये एवढी होती.

यालाच म्हणतात, देव जेव्हा देतो, तेव्हा 'छप्पर फाड के' देतो.