देवाला वाहिलेला शेतकरीपुत्र पुन्हा CM होणार! सिद्धरामय्यांचे टॅलेंट वकिलांनी हेरले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 04:35 PM2023-05-19T16:35:48+5:302023-05-19T16:40:03+5:30

CM Siddaramaiah Struggle Success Story: पहिली दुसरी नाही थेट पाचवीत प्रवेश घेतला, एका वकिलाने सिद्धरामय्या यांच्यातील गुण ओळखले अन् नशीब फळफळले...

CM Siddaramaiah Struggle Success Story: अलीकडेच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चितपट केले. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा सिद्धरामय्या विराजमान होणार आहेत. मात्र, सिद्धरामय्यांचा हा प्रवास अतिशय संघर्षमय होता. ७५ वर्षीय सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेणार आहेत. यापूर्वी २०१३ ते २०१८ दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

सिद्धरामय्या हे शेतकरी कुटुंबातून आले आहेत. सिद्धरामेश्वर किंवा शिवमंदिरासाठी जमीन कसणाऱ्या कुटुंबाने आपल्या एका मुलाला मंदिराचा वीरा मक्कलू किंवा शूर मुलगा म्हणून अर्पण करावे, ही गावची परंपरा. त्यामुळेच वडिलांनी सिद्धरामय्या यांना मंदिराला दान दिले. याच कारणामुळे वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत सिद्धरामय्या शाळेत जाऊ शकले नाहीत. दोन वर्षे त्यांनी मंदिरात राहून लोककला शिकल्या. सिद्धरामय्या यांना नंतर थेट पाचवी इयत्तेत प्रवेश देण्यात आला.

सिद्धरामय्या यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सी, कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या दिवसांपासून सिद्धरामय्या त्याच्या बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध झाले. सिद्धरामय्या यांची प्रतिभा पाहून ज्येष्ठ वकील ननजुडा स्वामी यांनी त्यांना म्हैसूर तालुक्यातून निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. सिद्धरामय्या त्यात विजयी झाले. सन १९८३ मध्ये भारतीय लोक दल पक्षाकडून पहिली विधानसभा निवडणूक लढवून आमदार झाले. कोणतीही विशेष राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सिद्धरामय्या तेव्हा ३६ वर्षांचे होते.

१९८५ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी सिद्धरामय्या यांना मंत्रीपद मिळाले. पण १९८९ मध्ये ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर पुनरागमन करत ते जनता दलात असताना १९९६ मध्ये उपमुख्यमंत्री झाले. यानंतर २००४ मध्ये, ते पुन्हा जेडीएस आणि काँग्रेस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांच्याशी मतभेद झाल्यानंतर सिद्धरामय्या यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यांनी स्वतःचा पक्ष काढण्याचा विचार केला, परंतु २००८ मध्ये सिद्धरामय्या यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिद्धरामय्या यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत १२ विधानसभा निवडणुका लढवल्या. पैकी ९ जिंकल्या.

सिद्धरामय्या यांनी सुरुवातीच्या काळात अनेक वर्षे वकिली केली. विद्यार्थी जीवनात सिद्धरामय्या यांच्यावर डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादाचा प्रभाव होता. राजकीय विरोधकही त्यांना नास्तिक म्हणत. ज्यावर त्यांनाच स्पष्टीकरण द्यावे लागले.

मी नास्तिक नाही. धार्मिक परंपरा आणि विधी पाळण्यावर माझा विश्वास आहे. मी तिरुपती आणि माले महाडेश्वरा बेट्टालाही गेलो आहे. पण देवाच्या शोधात मला हिमालयात जायचे नाही. प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून मी पाहतो. काही लोक माझ्यावर धर्मविरोधी म्हणून टीका करतात. नेहमी पापी कृत्यांमध्ये मग्न राहून आणि त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केल्याने तुमचे पाप धुतले जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण सिद्धरामय्या यांनी दिले हेते.

सिद्धरामय्या यांच्या पत्नीचे नाव पर्वथी सिद्धरामय्या आहे. राकेश हा त्यांचा मोठा मुलगा होता, ज्याचा बेल्जियममध्ये अनेक अवयव निकामी झाल्यामुळे वयाच्या ३९ व्या वर्षी मृत्यू झाला. धाकटा मुलगा यतींद्र राजकारणात सक्रीय आहे. सिद्धरामय्या यांच्या नावे १३ वेळा कर्नाटकाचे बजेट सादर करण्याचा विक्रम आहे.

सिद्धरामय्याही वादांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या सरकारने २०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लिंगायत आणि वीरशैवांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याची शिफारस करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. हे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या पराभवाचे एक कारण मानले गेले.