Karnataka Election: डीके आणि सिद्धरामैय्यांनी सोबत केला नाश्ता, मल्लिकार्जुन खर्गेंनी असा सोडवला कर्नाटकचा प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 01:36 PM2023-05-18T13:36:37+5:302023-05-18T13:42:16+5:30

कर्नाटकात सिद्धरामैय्या यांच्या हाती मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील.

Karnataka Election: कर्नाटकात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांची पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. सिद्धरामैय्या यांच्या हाती मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील.

चार दिवसानंतर कर्नाटक मुख्यमंत्रिपदासाठी सुरू असलेला गोंधळ थांबला. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे प्रयत्न आणि सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकातील राजकीय संकट सुटल्याचे म्हटले जात आहे. आता 20 मे रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

पक्षाच्या घोषणेपूर्वी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यासोबत निवासस्थानी बैठक घेतली. पक्षाचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी तिन्ही नेत्यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत ही माहिती दिली.

दरम्यान, या सर्व राजकीय गोंधळामध्ये आणखी एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिद्धरामैय्या आणि डीके शिवकुमार, रणदीप सुरजेवाला आणि केसी वेणुगोपाल यांच्यासोबत एकाच टेबलावर बसून इडली-डोसा खाताना दिसत आहेत.

काँग्रेस हायकमांडला मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तब्बल चार दिवस लागले. यादरम्यान अनेक बैठका झाल्या. या छायाचित्रात सिद्धरामेय्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत बसलेले दिसत आहेत.

या बैठकादरम्यान, कर्नाटकातील दोन्ही नेत्यांनी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी सिद्धरामेय्या यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली.

याशिवाय, सीएमपदाच्या शर्यतीत असलेले डीके शिवकुमार हेदेखील सिद्धरामय्यांच्या पाठोपाठ नेत्यांच्या भेटी घेत होते. त्यांनीदेखील कर्नाटकातील विजयानंतर दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली.

शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी चुरस सुरू होती. पण, अखेर पक्षाने सिद्धरामैय्या यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या घोषणेनंतर कर्नाटकात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी कर्नाटकात फटाके फोडून, ​​नाचत आणि गाऊन आनंद साजरा केला. आता 20 तारखेला कर्नाटक सरकारचा शपथविधी होणार आहे.