भारताची ताकद वाढली, जगातील सर्वात बलाढ्य ‘अपाचे’ हेलिकॉप्टर वायूसेनेत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 11:43 AM2019-09-03T11:43:00+5:302019-09-03T11:46:01+5:30

जगातील सर्वात बलाढ्य आणि ताकदवान अपाचे हेलिकॉप्टर भारतीय वायूसेनेत दाखल झालं आहे. पठाणकोट एअरबेसवर 8 AH064E अपाचे हेलिकॉप्टरचं जोरदार स्वागत करण्यात आलं. अमेरिकन बनावटीचं अपाचे हेलिकॉप्टर जगातील सर्वात बलाढ्य आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर मानलं जातं.

2020 पर्यंत भारतीय वायूसेनेला 22 अपाचे हेलिकॉप्टर मिळणार आहेत. मे 2019 मध्ये अमेरिकेची कंपनी बोइंगने भारताला एरिजोनामध्ये पहिले अपाचे हेलिकॉप्टर दिलं होतं. या हेलिकॉप्टरचा वायूसेनेत समावेश झाल्याने भारताच्या वायूसेनेची ताकद वाढली आहे. अमेरिकन लष्कर या हेलिकॉप्टरचा वापर तालिबानविरोधात युद्धात करते.

शत्रुच्या घरात घुसून मारण्याची क्षमता अपाचे हेलिकॉप्टरमध्ये आहे. अपाचे हेलिकॉप्टरचा वापर पाकव्याप्त काश्मीरसह दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी केला जाणार आहे. हे हेलिकॉप्टर 20 हजार फूट उंचावर उडू शकते.

बोइंग AH-64E अमेरिकन लष्कर आणि अन्य आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांसाठी सर्वात आधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर आहे. भारतीय वायूसेना रूस निर्मित सुखोई एमआय 35 चा वापर वर्षोनुवर्षे करत आहे.

अपाचे हेलिकॉप्टरला अशाप्रकारे बनविण्यात आलं आहे की, शत्रुच्या सीमेत घुसून त्यांच्या हल्ला करण्याची क्षमता ठेऊ शकतं. युद्धाच्या प्रसंगी अपाचे हेलिकॉप्टर महत्वाची भूमिका बजावू शकतं असं संरक्षण तज्ज्ञ सांगतात.

कोणत्याही प्रकारचं हवामान असो वा कोणतीही परिस्थिती त्याला सामोरं जाण्याचं आव्हान अपाचे हेलिकॉप्टर सहजरित्या पेलतं.