देशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन, मिळतात विमानतळासारख्या लक्झरी सुविधा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:12 IST2025-11-17T15:53:59+5:302025-11-17T16:12:40+5:30

Indian Railway: दिल्ली, मुंबई अन् बंगळुरुचे स्टेशन यासमोर फिके पडतील.

Indian Railway: भारतात आधुनिक पायाभूत सुविधा किंवा लक्झरी ट्रॅव्हलची चर्चा झाली की, दिल्ली, मुंबई, बंगळुरुचे नाव पुढे येते. मात्र, आश्चर्याची गोष्ट अशी की, देशातील पहिले प्रायव्हेटली मॅनेज्ड रेल्वे स्टेशन या महानगरांपैकी कोणत्याही ठिकाणी नसून ते मध्य प्रदेशाच्या राजधानी भोपाळमध्ये आहे. राणी कमलापती असे या रेल्वे स्टेशनचे नाव असून, हे व्यवस्थापनाच्या दृष्टीने एअरपोर्टलाही मागे टाकते.

भारतातील कोणीही कल्पना केली नसेल की, एक दिवस रेल्वे स्टेशनवर पाऊल ठेवल्यावर विमानतळाची लक्झरी अनुभवता येईल. परंतु हे स्वप्न आता सत्यात उतरले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये असलेले राणी कमलापती रेल्वे स्टेशन देशातील पहिले खाजगीरित्या व्यवस्थापित रेल्वे स्टेशन आहे. 2017 मध्ये हबीबगंज नावाने सुरू झालेले स्टेशन, 2021 पासून राणी कमलापती स्टेशन नावाने ओळखले जाऊ लागले.

भारतीय रेल्वे आणि बंसल ग्रुप यांच्या PPP (Public-Private Partnership) मॉडेलनुसार, स्टेशनचे संचालन व मेंटेनन्स प्रायव्हेट हातात, तर मालकी अजूनही सरकारच्याच हातात आहे. या अनोख्या मॉडेलमुळे स्टेशनच्या सुविधांना पूर्णपणे ‘एअरपोर्ट-लेव्हल’चा स्पर्श मिळाला आहे. स्टेशनमध्ये प्रवेश करताच जे दृश्य दिसते, ते भारतीय रेल्वेच्या पारंपरिक प्रतिमेला पूर्णपणे बदलते.

हे रेल्वे स्टेसन पूर्णतः एअर-कंडिशन्ड कॉनकोर्स, लखलखीत मार्बल फ्लोरिंग, विशाल, आरामदायी वेटिंग लाउंज, हाय-स्पीड एस्कलेटर व लिफ्ट सुविधा, गौर्मे फूड कोर्ट, प्रीमियम रिटेल आउटलेट, स्टेशन संकुलातच हॉटेल, ऑफिस स्पेस आणि सुपर-स्पेशॅलिटी हॉस्पिटलने सुसज्ज आहे. यामुळेच स्टेशनवर विमानतळासारका फील येतो.

राणी कमलापती स्टेशनची रचना पूर्णतः आधुनिक व शाश्वत तत्त्वांवर आधारित आहे. यात सोलर पॉवर सिस्टिम, 24x7 पॉवर बॅकअप, स्टेशनच्या प्रत्येक कोपऱ्याचे अॅडव्हान्स्ड CCTV मॉनिटरिंग, अतिशय शिस्तबद्ध व्यवस्थापन व स्वच्छता...ही सर्व वैशिष्ट्ये स्टेशनला जागतिक दर्जाच्या श्रेणीत स्थान देतात.

हे स्टेशन नवी दिल्ली-चेन्नई मेन लाइनवर वसलेले असून, भोपाल विभागाचे मुख्यालय आहे. येथून वंदे भारत, शताब्दी, राजधानी, दूरंतो यांसारख्या प्रीमियम ट्रेन अविरत धावत असतात. त्यामुळे उच्चस्तरीय प्रवाशांसाठी हे स्टेशन आता महत्त्वाचा ट्रांझिट हब बनले आहे. राणी कमलापती स्टेशनच्या यशामुळे आता भारतीय रेल्वेने इतर मोठ्या स्थानकांचेही आधुनिकीकरण गतीने सुरू केले आहे. येणाऱ्या काळात नवी दिल्ली, ,अहमदाबाद, मुंबई CSMT यांसारख्या प्रमुख स्टेशन्सवरही अशाच अत्याधुनिक सुविधा दिसू शकतात.