CoronaVirus: चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:48 AM2021-05-18T11:48:11+5:302021-05-18T11:52:56+5:30

CoronaVirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू बिहारमध्ये झाले आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दिली आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे.

कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असून, कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी जीवावर उदार होऊन दिवस-रात्र काम करीत आहेत.

कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यापासून आरोग्य व्यवस्थेने उसंत घेतलेली नाही. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल २६९ डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती मिळाली असून, यातील सर्वाधिक मृत्यू बिहारमधील आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम सर्वसामान्यांसह कोरोनाविरोधातील लढाई लढणाऱ्या डॉक्टरांनावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे.

रविवारी एकाच दिवशी ५० डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली. यातील सर्वाधिक मृत्यू बिहारमध्ये झाले आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दिली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये ६९, उत्तर प्रदेशात ३४ आणि दिल्लीत २७ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यापैकी फक्त तीन टक्के डॉक्टरांचे लसीकरण झाले होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्यावर्षी ७४८ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे जवळपास एक हजार डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागल्याचे सांगितले जात आहे.

देशात लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू असला, तरी अद्याप ६६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. डॉक्टरांचे लसीकरण वाढावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले.

रविवारी ५० डॉक्टरांचा मृत्यू आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २४४ डॉक्टरांनी जीव गमावणं आमच्यासाठी खूप दुर्दैवी आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर जयेश लेले यांनी सांगितले आहे.

डॉक्टरांची संख्या कमी असून, त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. अनेकदा विश्रांती न घेता डॉक्टर सलग ४८ तास काम करतात. यामुळे त्यांच्या त्रासात भर पडत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू होत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.