उत्तर-दक्षिण ते पूर्व-पश्चिम; 2026 मध्ये देशाला मिळणार चारही दिशा जोडणारे 8 नवे एक्सप्रेसवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:35 IST2026-01-01T14:07:45+5:302026-01-01T14:35:53+5:30
प्रवास, व्यापार आणि पर्यटनाला चालना; चारही दिशांना नवे एक्सप्रेसवे

नवी दिल्ली : 2026 भारताच्या आधुनिक पायाभूत सुविधांच्या (Infrastructure) इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. या वर्षात देशाला 8 नवीन अत्याधुनिक एक्सप्रेसवे मिळणार असून, यामुळे भारतातील रस्ते प्रवास, व्यापार, लॉजिस्टिक्स आणि आर्थिक विकासाला अभूतपूर्व गती मिळणार आहे. उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम दिशांना जोडणाऱ्या या एक्सप्रेसवे नेटवर्कमुळे औद्योगिक केंद्रे, बंदरे, धार्मिक स्थळे आणि पर्यटन हब यांच्यातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तासांचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होईल, असा दावा करण्यात येत आहे.

1) दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे: देशातील सर्वात मोठ्या रस्ते प्रकल्पांपैकी एक असलेला हा एक्सप्रेसवे सुमारे 1,355 किमी लांबीचा आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणारा हा मार्ग 6 ते 8 लेनचा असून भविष्यात 12 लेनपर्यंत विस्ताराची योजना आहे. आतापर्यंत 774 किमी मार्ग खुला झाला असून उर्वरित भाग मार्च 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

2) चेन्नई-बंगळुरू ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे: दक्षिण भारतातील दोन मोठ्या आर्थिक केंद्रांना जोडणारा 258 किमी लांबीचा हा एक्सप्रेसवे NHAI कडून भारतमाला प्रकल्प अंतर्गत उभारला जात आहे. जुलै 2026 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता असून, यामुळे IT कॉरिडोर आणि पोर्ट-आधारित लॉजिस्टिक्सला मोठी चालना मिळेल.

3) रायपूर-विशाखापट्टणम एक्सप्रेसवे: 464 किमी लांबीचा, 6 लेनचा हा इकॉनॉमिक कॉरिडोर छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना जोडणार आहे. मध्य भारत ते पूर्व किनाऱ्यावरील बंदरांपर्यंत व्यापार जलद होईल. डिसेंबर 2026 मध्ये हा मार्ग सुरू होण्याची अपेक्षा आहे.

4) अहमदाबाद-धोलेरा एक्सप्रेसवे: गुजरातमधील गुंतवणूक हब धोलेरा SIR ला अहमदाबादशी जोडणारा 109 किमी लांबीचा हा प्रकल्प औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 2026 च्या सुरुवातीलाच हा एक्सप्रेसवे सुरू होण्याची शक्यता आहे.

5) दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे: दिल्लीच्या बहादुरगड सीमेजवळून सुरू होणारा हा 670 किमी लांबीचा एक्सप्रेसवे पंजाबमार्गे जम्मू-कश्मीरमधील कटरा येथे संपेल. यामुळे दिल्ली-अमृतसर प्रवास 8 तासांवरून 4 तासांपर्यंत, तर दिल्ली-कटरा प्रवास 14 तासांवरून सुमारे 6 तासांपर्यंत कमी होईल.

6) दिल्ली-देहरादून एक्सप्रेसवे: सुमारे 210 किमी लांबीच्या या कॉरिडोरचा ट्रायल रन 1 डिसेंबर 2025 पासून सुरू झाला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला होणार असून, दिल्ली-देहरादून प्रवासाचा कालावधी 6 तासांवरून फक्त 2.5 तासांपर्यंत कमी होणार आहे.

7) गंगा एक्सप्रेसवे (मेरठ-प्रयागराज): उत्तर प्रदेशातील 594 किमी लांबीचा हा 6 लेन एक्सप्रेसवे 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. प्रकल्पाचे सुमारे 99% काम पूर्ण झाले असून, जानेवारी 2026 मध्ये उद्घाटन होण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम ते पूर्व यूपी प्रवास जलद होऊन व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल.

8) अमृतसर-जामनगर एक्सप्रेसवे: उत्तर-पश्चिम भारतातील महत्त्वाचा 1,257 किमी लांबीचा इकॉनॉमिक कॉरिडोर बठिंडा, बाडमेर आणि जामनगरसारख्या ऊर्जा व औद्योगिक पट्ट्यांना जोडणार आहे. यामुळे अमृतसर-जामनगर प्रवासाचा वेळ 26 तासांवरून सुमारे 13 तासांपर्यंत कमी होईल. एप्रिल 2026 पर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.

















