Rapid Rail Project: १४००० हजार कर्मचारी, ११०० इंजिनिअर्स मिळून तयार करतायत भारताची रॅपिड रेल, पाहा काय आहे हा प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 12:39 PM2022-08-21T12:39:09+5:302022-08-21T12:43:57+5:30

Facts about Rapid Rail Project: रॅपिड रेल्वेची चाचणी सुरू झाली असून मार्च २०२३ पासून ट्रेन धावण्याची अपेक्षा आहे. ८२ किमी लांबीचा हा कॉरिडॉर तयार करण्यासाठी १४ हजारांहून अधिक कामगार आणि ११०० अभियंते रात्रंदिवस काम करत आहेत.

Facts about Rapid Rail Project: भारतातील पहिल्या रॅपिड रेलचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. दिल्ली आणि मेरठ दरम्यान रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टमचे (RRTS) काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे आणि लवकरच या कॉरिडॉरवर गाड्या धावताना दिसतील. याची चाचणी सुरू झाली आहे आणि मार्च २०२३ पासून ट्रेन धावण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प पूर्णपणे सुरू झाल्यावर दिल्ली ते मेरठ हे अंतर अवघ्या ५० मिनिटांत पूर्ण करता येईल. दिल्ली-एनसीआरमधील रहिवाशांसाठी हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. या ८२.५ किमी लांबीच्या रेल्वे प्रकल्पाला जगातील सर्वात हायटेक प्रणाली देखील म्हटले जात आहे.

नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NCRTC) रॅपिड रेल प्रकल्पासाठी कॉरिडॉर तयार करत आहे. या प्रकल्पाची किंमत ३०,२७४ कोटी रुपये आहे. एनसीआरटीसीने रॅपिड रेल्वेच्या संचालन आणि देखभालीसाठी ड्यूश बान इंजिनिअरिंग अँड कन्सल्टन्सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (डीबी इंडिया) सोबत करार केला आहे. डीबी इंडिया ही जर्मनीची राष्ट्रीय रेल्वे कंपनी ड्यूश बान एजीची उपकंपनी आहे.

कॉरिडॉर बनवण्यासाठी देशात प्रथमच ६.५ मीटर व्यासाचे एकूण ८ टनेल बोरिंग मशीन्स (TBM) एकाच वेळी वापरल्या जात आहेत. या यंत्रांना 'सुदर्शन' असे नाव देण्यात आले आहे. देशातील पहिल्या RRTS कॉरिडॉरसाठी (दिल्ली-गाझियाबाद-मेरठ) ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टम (AFC) वापरली जाईल.

NCRTC ने स्वदेशी प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स (PSDs) डिझाइन आणि विकसित करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत करार केला आहे. या पीएसडीच्या माध्यमातून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरून थेट डब्याच्या आत जाता येणार असून त्यांच्या रुळांवर पडून होणाऱ्या अपघातांची शक्यता नाहीशी होणार आहे. NCRTC या प्रकल्पात एकात्मिक रिअल टाइम एंटरप्राइझ अॅसेट मॅनेजमेंट सिस्टम (I-Dreams) कार्यान्वित करणार आहे. या प्रणालीद्वारे, वेळेत कोणतीही जोखीम किंवा कमतरता शोधणे, दुरुस्त करणे किंवा दूर करण्यास मदत मिळणार आहे.

गुजरातमधील बॉक्बार्डियरच्या सावली प्लांटमध्ये रॅपिड रेल्वेचे कोच तयार केले जात आहेत. 'मेक इन इंडिया' मोहिमेअंतर्गत एकूण ४० ट्रेनसेट म्हणजेच २१० कोच तयार केले जातील. RRTS मध्ये, जगात प्रथमच, Long Term Evolution (LTE), युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम, डिजिटल इंटरलॉकिंग आणि ऑटोमेटेड ट्रेन ऑपरेशन (ATO) हे रेल्वे ऑपरेशन्सच्या रेडिओ नेटवर्कमध्ये एकमेकांशी जोडले जात आहेत. या व्यवस्थेमुळे ५-१० मिनिटांच्या अंतराने कोणत्याही अडथळ्याशिवाय ट्रेन चालवणे शक्य होणार आहे.

RRTS कॉरिडॉर दिल्ली मेट्रोच्या सर्व ७ मार्गांशी जोडला जाईल. अशाप्रकारे, दिल्ली मेट्रो आणि RRTS नेटवर्कसह दिल्लीच्या मास ट्रांझिट सिस्टमचं एकूण अंतर ७४३ किमी असेल, जी लंडन क्रॉस रेल, हाँगकाँग MTR आणि पॅरिस RER च्या अंतरापेक्षा जास्त असेल.

RRTS ट्रेनच्या डब्यांमध्ये बसण्यासाठी २x२ अशी आसनव्यवस्था असेल. याशिवाय प्रवाशांना उभे राहूनही प्रवास करता येणार आहे. स्वयंचलित प्लग-इन दरवाजे व्यतिरिक्त, रॅपिड रेलमध्ये गरजेनुसार निवडक दरवाजे उघडण्यासाठी पुश बटणे असतील. प्रत्येक स्थानकावर सर्व दरवाजे उघडण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे ऊर्जेचीही बचत होईल. आरआरटीएस ट्रेनमध्ये प्रशस्त, आरामदायक सीट्स असतील. याशिवाय बिझनेस क्लास कोचही असेल. प्रत्येक ट्रेनला बिझनेस क्लास कोच असेल. या स्पेशल कोचमध्ये प्लॅटफॉर्मवरूनच खास लाउंजमधून प्रवेश दिला जाईल. याशिवाय प्रत्येक ट्रेनमध्ये महिलांसाठी एक डबा राखीव असेल.

या कॉरिडॉरवरील ट्रेन कमाल ताशी १८० किमी वेगाने धावू शकतील. त्यांचा सरासरी वेग १०० किमी प्रतितास असेल. ६ कोचच्या ह्या ट्रेनचा लूक हुबेहूब बुलेट ट्रेनसारखा आहे. मात्र, बाजूने ती मेट्रोसारखे दिसते. या कॉरिडॉरची एकूण लांबी ८२ किमी आहे, त्यापैकी १४ किमी दिल्लीमध्ये आहे तर ६८ किमी उत्तर प्रदेशमध्ये आहे. हा मार्ग एकदा पूर्ण झाल्यानंतर, दिल्ली ते मेरठ प्रवास करण्यासाठी फक्त ५० मिनिटे लागतील.

दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉरवर जंगपुरा, सराय काले खान, न्यू अशोक नगर, आनंद विहार, साहिबाबाद, गाझियाबाद, गुलधर, दुहाई, मुरादनगर, मोदी नगर दक्षिण, मोदी नगर उत्तर, मेरठ दक्षिण, शताब्दी नगर, बेगमपुल आणि मोदीपुरम हे स्थानकं असतील. तर दिल्लीतील या कॉरिडॉरमध्ये जंगपुरा, सराय काले खान, न्यू अशोक नगर आणि आनंद विहार अशी चार स्थानके आहेत. यापैकी फक्त आनंद विहार स्टेशन हे भूमिगत आहे.