'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 15:23 IST2025-05-13T15:15:31+5:302025-05-13T15:23:32+5:30

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. त्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरात घुसून भारताने ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. त्यानंतर झालेल्या संघर्षात भारताने पाकिस्तानात अनेक सैन्य एअरबेसवर हल्ला केला. या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताच्या सीमेवरील शहरांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानचे जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब सीमेवरील शहरांवर होणारे ड्रोन आणि मिसाईल हल्ले भारताच्या ताकदीने परतावून लावले. पाकचे हल्ले रोखण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावली ती भारताच्या S 400 एअर डिफेन्स प्रणालीने, जी भारताने रशियाकडून खरेदी केली होती. आता रशिया भारताला आणखी एक मोठी ऑफर देत आहे.

रशियाने पुन्हा एकदा भारताच्या मैत्रीला जागत एकत्र मिळून S 500 एअर डिफेन्स सिस्टम उत्पादन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशियाने S400 ला ताकद बनवली. आता भारतानेही पाकिस्तान विरोधातील हल्ल्यात एस ४०० वापर करत पाकचे सर्व हल्ले अयशस्वी केलेत.

S400 हून अधिक प्रगतशील आणि शक्तीशाली S500 एअर डिफेन्स सिस्टम असणार आहे. जर ही एअर डिफेन्स सिस्टम भारताला मिळाली तर भारतीय सैन्याची ताकद दुप्पट होईल आणि पाकिस्तानची झोप उडेल.

काय आहे खास? S-500 एअर डिफेन्स सिस्टम शत्रूच्या हायपरसोनिक मिसाईल्स आणि पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फिरणारे सॅटेलाईट, गुप्तपणे येणारे विमान यांना मारण्यास सक्षम आहे. ही डिफेन्स सिस्टम अवकाश वातावरणाच्या कक्षेत जाऊन हल्ला करू शकते. त्याची मारक क्षमता ६०० किमी पर्यंत आहे त्याशिवाय २०० किमी उंचीपर्यंत लक्ष्य भेदू शकते.

या एअर डिफेन्स सिस्टममध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे एंटी बॅलेस्टिक मिसाईल क्षमता आहे. ती हायपरसोनिकत ग्लाईड वाहने आणि लांबपल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट करण्याची क्षमता ठेवते. त्यासाठी 77N6-N, 77N6N1 नावाची खास मिसाईलचा वापर करता येतो. या मिसाईल इतक्या मोठ्या आहेत ज्या S400 मध्ये वापरू शकत नाहीत.

S500 च्या मदतीने भारत अंतराळातील गोष्टींनाही टार्गेट करू शकते. माहितीनुसार, S500 चा रडार आधुनिक आहे. जे २००० किमी दुरूनही शत्रूंच्या टार्गेटला ओळखू शकते. S500 डिफेन्स अमेरिकेच्या THAAD सारख्या बड्या डिफेन्स सिस्टमहून अधिक चांगली आहे असा रशियाने दावा केला आहे.

एस ५०० सिस्टम एकाचवेळी हवेत सुरक्षा, मिसाईलपासून सुरक्षा आणि सॅटेलाईट पाडण्याचेही कामही करू शकते. सैन्य तज्त्रांनुसार S 500 डिफेन्स क्षेत्रात एक मोठा बदल आणू शकते. रशियाचा हा प्रस्ताव भारतासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या सैन्याची ताकद वाढेल. भारत या प्रस्तावावर काय निर्णय घेतो ते पाहावे लागेल असं त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरमध्ये एस ४०० एअर डिफेन्स सिस्टम पाकिस्तानच्या हल्ल्याविरोधात ढाल बनून भारताचे रक्षण करत होती. हवेत एक प्रभावी सुरक्षा कवच म्हणून एस ४०० ने काम केले. बराक ८ सह स्वदेशी आकाश मिसाईलसह एस ४०० ने पाकिस्तानी मिसाईल हवेतच उद्ध्वस्त करून खाली पाडली.

आता रशियाने भारताला अत्याधुनिक एस ५०० एअर डिफेन्सचं संयुक्त उत्पादन करण्याची ऑफर दिली आहे. हा प्रस्ताव केवळ खरेदी पुरता मर्यादित नाही तर त्यात तंत्रज्ञानही ट्रान्सफर करण्याची ऑफर दिली आहे. दिल्ली-मुंबईसारख्या शहरांची सुरक्षा,संवेदनशील ठिकाणांच्या रक्षणासाठी एस ५०० सारखी सिस्टम गरजेची आहे.