'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 08:25 IST2025-05-06T08:21:52+5:302025-05-06T08:25:51+5:30

जम्मू काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात कठोर पावले उचलली आहेत. त्यात पाकिस्तानसोबतचे सगळे संबंध भारताने संपुष्टात आणले असून राजनैतिक चर्चेलाही पूर्णविराम दिला आहे.
सध्या भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात युद्धाचे सावट आहे. भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकते असा दावा पाक नेत्यांकडून केला जात आहे. त्याशिवाय भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्ताननं जगातील अनेक देशांकडे या परिस्थितीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थितीचे संकेत मिळत आहेत त्यातच भारताने पाकिस्तानी सीमेजवळील पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ब्लॅकआऊट प्रॅक्टिस सुरू केली आहे. पंजाबच्या फिरोजपूर येथील भारतीय सैन्याने छावणीत रविवारी रात्री अर्धा तासासाठी ब्लॅकआऊट अभ्यास केला. हा सराव संभाव्य युद्धाच्या तयारीचा भाग मानला जात आहे.
हा अभ्यास रात्री ९ ते ९.३० या काळात करण्यात आला. ज्यात संपूर्ण परिसरात पूर्णत: अंधार ठेवण्यात आला होता. फिरोजपूरमध्ये ब्लॅकआऊट अभ्यास यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांकडे मदतीचं आवाहन केले होते, ज्यात घरात अथवा घराबाहेर कुठलाही इन्वर्टर किंवा जनरेटर लाईट दिसू नये.
ब्लॅकआऊट काय असते? - ब्लॅकआऊटबाबत सांगायचे झाले तर त्याचा प्रोटोकॉल युद्धाच्या काळात खूप प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो. त्याचा मुख्य उद्देश देशातील रहिवासी परिसराचे लोकेशन शत्रूला मिळण्यापासून रोखणे हे आहे. आधुनिक युद्धात ड्रोन आणि मिसाईलचा वेग खूप अधिक आहे.
युद्धकाळात रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. परंतु भारताकडे रशियाचे ताकदीचे S400 हे शस्त्र आहे जे पाकिस्तानच्या कुठल्याही मिसाईलला सीमेत घुसण्याआधीच उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवते. तरीही खबरदारी म्हणून ब्लॅकआऊट सराव करण्याची तयारी सैन्याने केली आहे.
भलेही आजच्या काळात स्मार्ट मिसाईल, आधुनिक हत्यारे आली आहेत परंतु ब्लॅकआऊट प्रभावी आहे कारण स्मार्ट बॉम्ब आणि व्हिजुअल टार्गेट करणाऱ्या ड्रोनला प्रकाश लागतो. ब्लॅकआऊट स्थितीत पाकिस्तानी ड्रोन अथवा मिसाईल त्यांचे टार्गेट मिस करू शकते ज्यातून अनेक लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो.
विशेष म्हणजे युद्धाच्या परिस्थितीत प्रशासन, सरकार देशातील नागरिकाला प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सराव करते, त्याशिवाय सध्याच्या युद्धात सायरन, मोबाईल एसएमएसद्वारे लोकांना अलर्ट पाठवते.
पाकिस्तानसोबत युद्धाचे ढग दिसताना देशातील जनतेला युद्धाच्या काळात कसं तयार राहायचे याचे प्रशिक्षण देण्यास केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना केल्यात. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सिस्टम शहरात लावणे, सामान्यांना आवश्यक ट्रेनिंग देण्याची सूचना केली आहे.
युद्धाच्या काळात सर्वसामान्य जनतेला सुरक्षित स्थळी नेणे, आवश्यक वस्तूंची पूर्तता करणे यात सिव्हिल डिफेंसची महत्त्वाची भूमिका असते. १९७१ नंतर कुठलेही युद्ध झाले नाही त्यामुळे हवाई हल्ल्याबाबत अलर्ट करणाऱ्या सायरन सिस्टमची तपासणी केली नाही. त्यामुळे सायरन सिस्टम प्रणाली चालू करणे, आवश्यकता असल्यास नवीन सिस्टम लागू करण्यास सांगितले आहे.