नोकरी किंवा काम कधीपर्यंत करावे? 'ही' माहिती ठरेल मार्गदर्शक, वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 09:14 AM2022-08-24T09:14:28+5:302022-08-24T09:17:52+5:30

ठराविक वयानंतर लोक निवृत्त होतात, पण निवृत्तीनंतरही काम सुरू ठेवणे खूप लाभदायक असते. त्याचा मोठा फायदा होतो. चला त्याबाबत जाणून घेऊयात...

कर्नल (निवृत्त) दलजित एस.चिमा १९९४ मध्ये लष्करातून निवृत्त झाले. मात्र त्यावेळी त्यांची पेन्शन ४,५०० रुपये होती. निवृत्तीनंतर तीनच दिवसांनी त्यांनी पंजाब विद्यापीठात शिकविण्याची नोकरी धरली आणि अतिरिक्त उत्पन्न मिळविले. ७९ वर्षीय चिमा यांनी १८ पुस्तकेही लिहिली आहेत. ते आज सक्रियच नव्हे, तर आर्थिक दृष्ट्याही सुरक्षित आहेत.

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पुरेल एवढा पैसे तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही काम करण्यास सक्षम असाल तर तुम्ही तुमच्याच कंपनीत मुदतवाढ घेऊ शकता.

निवृत्तांचे २ प्रकार असतात. पैशांची गरज असणारे व पैसे असूनही कामात वा आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सक्रिय राहू इच्छिणारे. या दोघांसाठीही काम करीत राहणे हितकर असते. वयाची साठी ही आजच्या नव्या युगाची चाळीशी आहे. आता लोक साठीनंतरही सक्रिय राहू इच्छितात.

दिल्लीस्थित ६२ वर्षीय नीरज गुप्ता या सप्टेंबर २०२० मध्ये निवृत्त झाल्या. त्यानंतर त्यांनी लगेचच स्वत:चे यूट्यूब चॅनल सुरू केले. गेल्या वर्षी त्यांनी एका शाळेत शिकविण्याची नोकरीही स्वीकारली. वैवाहिक जोडीदारांत ५ वर्षांचे अंतर असेल तर अगोदर निवृत्त होणाऱ्यास घरी स्वस्थ बसून राहणे अवघड जाते. अशावेळी काम करणे कधीही चांगले.

एक मोठा फायदा म्हणजे तुम्ही निवृत्त झाल्यानंतर ५-१० वर्षे काम करत राहिल्यास तुम्हाला तुमच्या मुलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही तुमच्या मुलांचे योगदान न घेता किंवा त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम न करता तुम्ही सन्माननीय जीवन जगू शकता.

निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा खर्च म्हणजे वैद्यकीय समस्या. तथापि, सामान्यत: ज्येष्ठ नागरिक हे उत्तमरित्या प्रतिसाद देत नाहीत. कारण ते थकलेले असतात. त्यामुळे सेवानिवृत्ती घेताना किंवा पुन्हा नव्याने काम सुरू करताना आरोग्य विमा नक्की घ्या. त्यामुळे पैशांसाठी इतरांपुढे हात पसरण्याची गरज पडत नाही.

टॅग्स :भारतIndia