भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 17:52 IST2025-05-06T17:16:18+5:302025-05-06T17:52:37+5:30

India-Pakistan War: भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चारवेळा युद्ध झाली होती. या चारही युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं होतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली ही चार युद्धं नेमकी किती दिवस चालली होती. तसेच किती दिवसांनंतर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली, याचा घेतलेला हा आढावा.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आधीच बिघडलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. एकमेकांवर कुटनीतिक मार्गांनी आघात केल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटतंय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचं लष्करी सामर्थ्य आणि आतापर्यंत झालेल्या संघर्षांचा आढावा घेतला जात आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चारवेळा युद्ध झाली होती. या चारही युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं होतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली ही चार युद्धं नेमकी किती दिवस चालली होती. तसेच किती दिवसांनंतर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली, याचा घेतलेला हा आढावा.

भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिलं युद्ध काश्मीरवरील ताब्यावरून झालं होतं. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांतच या युद्धाला तोंड फुटलं होतं. हे युद्ध १९४७ साली सुरू झालं होतं. तर १ जानेवारी १९४९ रोजी रात्री युद्धविराम लागू होऊन हे युद्ध थांबलं होतं. या युद्धात भारताने पाकिस्तानच्या कब्जातील सुमारे दोन तृतियांश भाग आपल्या ताब्यात घेतला होता. तर पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्थान आणि पीओके बळकावला होता.

भारत आणि पाकिस्तानमधील दुसरं युद्ध १९६५ साली झालं होतं. हे युद्ध ५ सप्टेंबर १९६५ रोजी सुरू झालं होतं. तर २३ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदीसह समाप्त झालं होतं. या युद्धात भारतीय लष्कराने लाहोरपर्यंत धडक मारली होती. मात्र संयुक्त राष्ट्रांची मध्यस्थी आणि ताश्कंद करारानंतर दोन्ही देशांनी माघार घेतली. हे युद्ध थांबलं नसतं तर लाहोर भारताच्या हद्दीत राहिलं असतं. ताश्कंद करारानुसार दोन्ही देशांनी आपापले दावे सोडून वादग्रस्त परिसरातून आपलं सैन्य मागे घेतलं.

भारत आणि पाकिस्तानमधील १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. हा भारताचा पाकिस्तानवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जातो. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव करत बांगलादेशची निर्मिती केली होती. तसेच पाकिस्तानच्या सुमारे ९० हजार हून अधिक सैनिकांनी आत्मसमर्पण केलं होतं.

पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांनी कारगिल भागात केलेल्या घुसखोरीमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये हे युद्ध झालं होतं. हे युद्ध ३ मे १९९९ ते २६ जुलै १९९९ दरम्यान चाललं होतं. या युद्धात भारतीय लष्कराने ऑपरेशन विजयच्या माध्यमातून कारगिलमधील उंच शिखरांवर पुन्हा कब्जा केला होता. सुमारे ३ महिने चाललेलं हे युद्ध २६ जुलै रोजी समाप्त झालं होतं. त्या दिवसाची आठवण म्हणून २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून पाळला जातो.