शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना माजी लष्करप्रमुख नरवणेंचे 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' पुस्तक प्रकाशित होण्याआधीच कसे मिळाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:06 IST

1 / 7
माजी लष्करप्रमुख जनरल एम.एन. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाने दिल्लीतील राजकारण ढवळून निघाले. संसदेचे कामकाज ठप्प झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराचे भाषणही होऊ शकले नाही.
2 / 7
त्यामुळेच प्रश्न सध्या दिल्लीतील केंद्रीय राजकारणात उपस्थित होत आहे की, २०२४ मध्ये प्रकाशित होऊ घातलेले हे पुस्तक विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापर्यंत कसे पोहोचले? फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक २०२४ मध्ये प्रकाशित होणार होते. बुक स्टॉल्सनी आधीच बुकिंगही केली होती. पण अचानक त्याचे प्रकाशन रोखण्यात आले. तेव्हापासून हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या प्रतिक्षेत आहे.
3 / 7
पण, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हे छापलेले पुस्तक मिळाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींनी या पुस्तकाबद्दल एका मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेख आणि त्यातील काही भाग वाचून दाखवला. त्यावरूनच प्रचंड गोंधळ झाला.
4 / 7
आजतकने रिपोर्ट्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांमध्ये म्हटले आहे की, या पुस्तकाच्या काही प्रति २०२४ मध्ये दिल्लीतील काही पुस्तकाच्या दुकानांमध्ये आल्या होत्या. पण वाद निर्माण झाल्याने त्या परत माघारी घेण्यात आल्या. एका पुस्तकालयातील कर्मचाऱ्याने सांगितले की, शेकडो लोकांनी प्री ऑर्डर बुकिंग केली होती.
5 / 7
पुस्तकाच्या प्रकाशनाला मंजुरी मिळण्यापूर्वीच त्यांची छपाई करून प्रति का तयार केल्या गेल्या, याबद्दल प्रकाशकांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधींना या पुस्तकाची प्रत लेखकाकडूनच देण्यात आली. पण याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
6 / 7
रिपोर्टनुसार, २०२० ते २०२४ या काळात संरक्षण मंत्रालयाने ३५ लष्करी पुस्तकांना मंजुरी दिली. पण, माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे पुस्तक अजूनही समिक्षेसाठी ठेवले गेले आहे. प्रकाशकांनी सांगितले की, यात देशाचे नेतृत्व आणि लष्काराशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एलएसीवरील संघर्ष आणि अग्निपथ योजना याबद्दलही नरवणे यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे.
7 / 7
नरवणे यांनी सीमेवरील सुरक्षा आणि अग्निपथ योजनेबद्दल मांडलेली मते, यामुळेच या पुस्तकाला मंजुरी दिली जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. लोकसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले होते की, जर पुस्तक प्रकाशित झालेले नाही, तर त्याचे संदर्भ देणे योग्य नाही. त्यानंतरही राहुल गांधी असे म्हणाले होते की, हे पुस्तक मी पंतप्रधान मोदींना भेट म्हणून देऊ इच्छितो.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदDefenceसंरक्षण विभागBJPभाजपाcongressकाँग्रेस